Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपुरातील गरबा कार्यक्रमातील वादातून तरुणावर चाकूहल्ला; दोघे अटकेत

नागपुरातील गरबा कार्यक्रमातील वादातून तरुणावर चाकूहल्ला; दोघे अटकेत

Image Source:(Internet)

नागपूर : गरबा कार्यक्रमातून बाहेर काढल्याच्या रागातून निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेत एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील मनीषनगर परिसरात घडली.

१९ ऑक्टोबरच्या रात्री सुरेश ग्राउंड येथे घडलेल्या या हल्ल्यात अथर्व वाडीभस्मे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अजनी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य दोन संशयितांचा शोध घेतला जात आहे.

गरबा कार्यक्रमातील वादाचे हल्ल्यात रूपांतर-

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबरच्या रात्री मनीषनगरातील रुद्र बारजवळ असलेल्या सुरेश ग्राउंड येथे गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही तरुण मद्यधुंद अवस्थेत कार्यक्रमस्थळी येऊन शिवीगाळ करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बाऊन्सरच्या मदतीने त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले.

याच घटनेवरून तक्रारदार कृष्णा बराडिया आणि संबंधित तरुणांमध्ये वाद झाला. त्यानंतर हे तरुण तेथून निघून गेले. मात्र, काही वेळाने हा वाद पुन्हा उफाळून आला.

फोन करून बोलावले अन् चाकूने हल्ला-
या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस ढेंगे याने कृष्णा बराडिया याला फोन करून त्याचा मित्र अथर्व वाडीभस्मे याच्यासह घटनास्थळी बोलावल्याचा आरोप आहे. गरबा कार्यक्रमातून बाहेर काढल्याच्या कारणावरून पुन्हा वाद सुरू झाला. या वादादरम्यान अथर्ववर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्या छातीवर दोन ते तीन वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला.

मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार-

हल्ल्यानंतर अथर्वला तातडीने तायवाडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून, डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

दोघांना अटक; अन्य आरोपींचा शोध-
घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी तेजस ढेंगे आणि अल्ताफ आलम अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अन्य दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat