Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्य सरकारचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; मृत पशुधनासाठी ४० हजार, घरांसह विविध नुकसानीसाठी वाढीव मदत जाहीर

राज्य सरकारचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; मृत पशुधनासाठी ४० हजार, घरांसह विविध नुकसानीसाठी वाढीव मदत जाहीर

Image Source:(Internet)

मुंबई : जुलै २०२६ मध्ये पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे बाधित झालेल्या नागरिकांना राज्य सरकारने विशेष वाढीव आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ४० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये, लहान ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी २० हजार रुपये, तर मेंढी, बकरी आणि डुकरांसाठी ४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ हजार रुपये आणि कुक्कुट पक्ष्यांसाठी प्रति पक्षी १०० रुपये, कमाल १० हजार रुपये मदत मिळणार आहे.

तसेच, पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी १.५० लाख रुपये, अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी १५ हजार ते ५० हजार रुपये, झोपडी नष्ट झाल्यास १५ हजार रुपये, कपडे व घरगुती वस्तूंच्या नुकसानीसाठी प्रत्येकी १० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

याशिवाय, मत्स्य व्यवसायिकांच्या बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी ५ हजार ते २५ हजार रुपये, तसेच हस्तकला, हातमाग कारागीर आणि दुकानदारांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

शासनाच्या निकषांनुसार पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थी निश्चित केले जातील. त्यानंतर मंजूर निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat