Dailyhunt
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर; झिशान सिद्दीकींना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर; झिशान सिद्दीकींना संधी

Image Source:(Internet)

मुंबई : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार अखेर जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे झिशान सिद्दीकी यांना ही संधी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उमेदवाराच्या नावावरून पक्षात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बुधवारी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला होता. अखेर पक्षाच्या बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनांनी त्यांच्या राजकीय प्रवासात मोठे वळण आणले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर झिशान यांना विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.

पराभवानंतर झिशान यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तरीही, सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन नवसंजीवनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, या उमेदवारीसाठी पक्षात मोठी चुरस पाहायला मिळाली. जवळपास ८० इच्छुकांची नावे चर्चेत होती. अंतिम टप्प्यात पाच नावांवर विचार झाला. काही नेत्यांकडून अन्य पर्यायांचा आग्रहही धरण्यात आला होता. मात्र, अखेर पक्षाच्या वरिष्ठ बैठकीत झिशान सिद्दीकी यांच्या नावावर एकमत झाले.

मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नव्या चेहऱ्यांच्या माध्यमातून शहरात आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. झिशान सिद्दीकी यांचे उच्चभ्रू वर्तुळातील संपर्क, तसेच विविध क्षेत्रांतील ओळखी लक्षात घेता, मुंबईत पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat