Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवर फडणवीस आक्रमक; काँग्रेसवर साधला निशाणा

सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवर फडणवीस आक्रमक; काँग्रेसवर साधला निशाणा

Image Source:(Internet)

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर करण्यात आलेल्या टीकेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या वक्तव्याचा निषेध करत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसला लक्ष्य केले.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजकीय विरोध करताना एक मर्यादा पाळली गेली पाहिजे. मात्र, काँग्रेसकडून करण्यात आलेली टीका ही राजकारणाचा दर्जा घसरवणारी असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेमध्ये प्रभाव निर्माण होत नसल्यामुळे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

"बदनामी झाली तरी प्रसिद्धी मिळते, अशा मानसिकतेतून काही जण राजकारण करत आहेत," असा टोला फडणवीस यांनी लगावला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशा पातळीवरील वक्तव्ये दुर्दैवी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही काँग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवर नाराजी व्यक्त करत, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेली टिप्पणी ही महिलांचा अवमान करणारी असल्याचे म्हटले.

मुंडे म्हणाले की, काँग्रेसने आपल्या इतिहासाचा विचार करायला हवा. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वातून मजबूत नेतृत्व दाखवले होते. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारही भविष्यात आपल्या कामातून प्रभावी नेतृत्व सिद्ध करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषिमंत्री दत्ता भरणे यांनीदेखील काँग्रेसच्या वक्तव्याचा निषेध केला. सुनेत्रा पवार यांचे सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्या एक यशस्वी व्यावसायिक तसेच शेतकरी कुटुंबाशी संबंधित असून, महिलांचा सन्मान राखणे ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, 'गुंगी गुडिया' या शब्दप्रयोगावरून निर्माण झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat