Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'टीकेला घाबरू नका, कृतीतून उत्तर द्या'; हर्षवर्धन सपकाळांचे सुनेत्रा पवारांना आव्हान

'टीकेला घाबरू नका, कृतीतून उत्तर द्या'; हर्षवर्धन सपकाळांचे सुनेत्रा पवारांना आव्हान

Image Source:(Internet)

मुंबई : राज्याच्या राजकारणात काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या पोस्टवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली.

सपकाळ म्हणाले की, लोकशाहीत पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्या प्रश्नांची उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे. संबंधित पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न उपस्थित होत असताना काही मंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्या प्रसंगी कोणतीही भूमिका मांडली नाही, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडियावरील शब्दप्रयोग हा वैयक्तिक टीका नसून त्यांच्या सार्वजनिक भूमिकेवर केलेले भाष्य आहे. "टीका ही लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याऐवजी आपल्या कामातून आणि स्पष्ट भूमिकेतून उत्तर देणे अधिक योग्य ठरेल," असेही सपकाळ म्हणाले.

इतिहासाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, अनेक मोठ्या नेत्यांनाही कठोर टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र त्यांनी आपल्या कामगिरीतून टीकाकारांना उत्तर दिले. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनीही महत्त्वाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या सोशल मीडिया पोस्टचा निषेध करत अजित पवार गटाने राज्यभर आंदोलन सुरू केले असून काँग्रेसवर महिला नेत्यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat