Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका; पतंजलीच्या दिव्य फार्मसीचा ७३ लाखांचा औषधसाठा जप्त

तुकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका; पतंजलीच्या दिव्य फार्मसीचा ७३ लाखांचा औषधसाठा जप्त

Image Source:(Internet)

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या धडक कारवाईचा फटका आता पतंजली समूहालाही बसला आहे.

भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात एफडीएने पतंजलीच्या दिव्य फार्मसीवर कारवाई करत ७३ लाख २५ हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला आहे.

एफडीएच्या तपासात दिव्य फार्मसीच्या काही उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये कर्करोग, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवर खात्रीशीर उपचार मिळत असल्याचे दावे करण्यात आल्याचे समोर आले. तसेच वैज्ञानिक पुरावा नसलेल्या उपचारांना चमत्कारिक स्वरूप देऊन ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या जाहिराती औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. त्यामुळे संबंधित औषधसाठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आरोग्याशी संबंधित गैरप्रकार, भेसळ आणि फसव्या जाहिरातींविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान ५३ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या असून विविध प्रकरणांत ३३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Abhijeet Bharat