Dailyhunt
'आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण ...'अशोक खरात प्रकरण असह्य झालं, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मार्मिक पोस्ट चर्चेत

'आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण ...'अशोक खरात प्रकरण असह्य झालं, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मार्मिक पोस्ट चर्चेत

ABP माझा 1 week ago

Actress Sonali Kulkarni on Ashok Kharat: महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. अंधश्रद्धेचा काळाबाजार मांडत या भोंदू बाबाने शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणात अशोक खरातवर एका मागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. या भोंदू बाबाच्या रोज नवनव्या कुरापती, कारनामे समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे. कला विश्वातूनही अनेक जण या प्रकरणावर बोलताना दिसतायत. दरम्यान भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फेसबुक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केलाय.

स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे.खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये अनेक बड्या नेत्यांचा, बडे हस्तींचा समावेश असल्याची शंका उपस्थित होत आहे.

काय म्हणाली सोनाली कुलकर्णी?

सोनाली म्हणाली ' आता तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेऊया. महिलांवर घृणास्पद अत्याचार, लैंगिक खुळाचार,आर्थिक फसवणूक,ऐय्याशी,भावनिक शोषण..दांभिकता..किती संतापजनक,केवढी पिळवणूक..अजूनही आपण म्हणणार का की आमच्याच धर्मातले अंधश्रद्धा का दिसते..आपल्या उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको?की माझी ती पवित्र अस्वच्छता आणि दुसऱ्याची ती दुर्गंधी?? महाराष्ट्रात, आपल्या भोवताली हे घडतंय. आपण ठगले जातोय. जागे होऊया. " असं सोनालीने लिहिलंय. सोबत तिने हात जोडलेला एक फोटो शेअर केलाय.

महाराष्ट्रभरातून येतायत प्रतिक्रिया

सोनालीच्या पोस्टवर महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया येत आहेत.अनेक जण तिच्या पोस्टवर विचार करताना दिसतायेत. आपले विचार कमेंटमध्ये मांडतानाही दिसत आहेत. एकाने लिहिलं " 'पुरोगामी महाराष्ट्र हा फक्त नावाला उरला आहे. जादूटोणा नरबळी पशुबळी कितीतरी अनिष्ट रूढी परंपरा आपल्या समाजात आता नवीन राहिलेल्या नाहीत.या गोष्टीचे मापलेच राजकारणी समाजातील प्रतिष्ठित लोक देखील करतात , किंवा अशा घटनांमध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होतात तेव्हा हे सगळं असह्य होतं . 'दरम्यान यापूर्वी अभिनेता अतुल कुलकर्णी, सचिन गोस्वामी यांच्यासह अनेक अभिनेते व अभिनेत्रींनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha