अभिषेक शर्मानं हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज विरोधात 13 बॉलमध्ये 35 धावांची खेली केली. अभिषेक शर्मानं 269.23 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना 2 चौकार आणि 4 षटकार मारले.
मात्र, लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरकडे कॅच देत अभिषेक शर्मा बाद झाला.
अभिषेक शर्मानं आक्रमकपणे फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. हैदराबादच्या 50 धावा 3.2 ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या होत्या. 20 बॉलच्या अर्धशतकीय भागीदारीत अभिषेक शर्मानं 35 धावा आणि ट्रेविस हेडनं 18 धावा केल्या.
अभिषेक शर्मानं पंजाबचा गोलंदाज मार्को यानसेनची जोरदार धुलाई केली. हैदराबादच्या डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मानं 2 चौकार आणि 2 षटकार मारला. हैदराबादनं त्या ओव्हरमध्ये 21 धावा केल्या. त्यातील 20 धावा अभिषेक शर्माच्या होत्या.
अभिषेक शर्मानं आयपीएलमध्ये एका ओव्हरमध्ये 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याच्या संदर्भात महेंद्रसिंह धोनीसोबत बरोबरी केली आहे. दोघे संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. अभिषेकनं अशा प्रकारची कामगिरी 10 वेळा केली आहे. धोनीनं देखील अशी कामगिरी 10 वेळा केली आहे.
एकीकडे अभिषेक शर्मानं महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली आहे तर दुसरीकडे रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. रोहितनं आयपीएल करिअरमध्ये 9 वेळा 20 आणि त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा रोहित शर्माच्या पुढे पोहोचला आहे.
आयपीएल 2026 मध्ये अभिषेक शर्मानं आतापर्यंत 43 चौकार आणि 36 षटकार मारले आहेत. त्यानं या हंगामात 475 धावा केल्या आहेत. त्यापैकी 388 धावा चौकार आणि षटकारांच्या द्वारे काढल्या आहेत. दरम्यान, हैदराबादनं पंजाबसमोर विजयासाठी 236 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

