Tukaram Mundhe : नियमाच्या बाहेर जायचं नाही, म्हणून मला नियम घालून दिला आहे. विद्यार्थ्यांना फक्त करिअर बद्दल मार्गदर्शन करायचं आहे. मागील 20 ते 25 वर्षात आमच्या बुडाखालून एवढं पाणी गेलं आहे.
आता पुस्तक शोधणे तर सोडा ज्ञान देखील शोधण्याची गरज नाही. कारण ज्ञान तुमच्या खिशात आहे. एवढ तंत्रज्ञान पुढे गेलं आहे, असे मत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. भविष्यात कोणत्या गोष्टीची गरज या दृष्टीने आपल्याला काम करावं लागणार आहे. डिजिटल युगात मोबाईलमधून बाहेर येणे अशक्य आहे. त्याचा वापर करावा, मात्र मोबाईलने आपल्याला वापरायचं की आपण मोबाईल वापरायचं याच विचार करायला हवं असेही मुंढे म्हणाले.
प्रत्येक गोष्टीला प्रश्न करणे हे स्कील आपल्याला अवगत करणे गरजचे
नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृहाात मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस् द्वारे आयोजित शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण आणि करियर मार्गदर्शन कार्यक्रमात तुकाराम मुंढे बोलत होते. कोणती गोष्ट हाताळत आहोत, याचा विचार करणं गरजेचं आहे. ज्ञानापासून विवेकापर्यंत पोहचणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रत्येक गोष्टीला प्रश्न करणे हे स्कील आपल्याला अवगत करणे गरजचे असल्याचे मुंढे म्हणाले. आपण रिल पाहतो ती किती खरी किंवा आपल्याला पाठवायचा उद्देश काय याची पडताळणी करा. आज मला आवडत हे ऐकण्याची तयारी आहे, मात्र मला आवडत नाही ते ऐकण्याची माझी तयारी नाही. त्यामुळं डिजिटल अँप मुळात वाईट नाही, त्याला वापरायचं कस हे आपल्याला ठरवायचं आहे असेही तुकाराम मुंढे म्हणाले.
AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज
आगीचा उद्देश जंगल जाळण्यासाठी की स्वयंपाक करण्यासाठी करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. कोणतीही गोष्ट आपण शेअर करतो तेव्हा ती चांगली की वाईट हे जाणून घेणे आवश्यक असल्याचे मुंढे म्हणाले. थोर महापुरुषांनी आपल्याला शिक्षण शिकण्याचे धडे दिलेत. आज AI च्या जगात वावरताना विवेकापर्यंत पोहचण्याची गरज आहे. आज सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जीवनभर शिकण्याची सवय लावून घेणे गरजचे आहे नाहीतर AI च्या दुनियेत आपण टिकू शकणार नाही असे मुंढे म्हणाले. मशीनचा वापर किती आणि कसा करायचा याचं तारतम्य आपल्याला बाळगणे गरजेचे आहे. आज आपण महासत्ता बनण्यासाठी स्वप्न बघतो. यात वाईट नाही मात्र, आधी जगात महासत्तेसाठी अनेक युद्ध झालेत. मात्र आता सुरु असलेले युद्ध विचाराचे आहे. आज इंस्टाग्राम, सोशल मीडियावरून विचार एकाकी करण्याचे काम सुरु आहे. आपण प्रवाहात वाहून जातोय, मग तो प्रवाह योग्य दिशा निवडून असला पाहिजे आणि निवडला गेलेला प्रवाह तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तो समाजासाठी असायला हवं असे मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. आज झुंडशाहीत आपण वाहत चाललो आहे. प्रवाहसोबत वाहत चाललो आहे. राजाने सांगितलं म्हणून अधिकाऱ्याने मारलं ते नियमानुसार योग्य मात्र नियतीने अयोग्य आहे. हिटलरने केलं ती विचारशून्यता होती असे मुंढे म्हणाले.
Author : रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर

