Amol Mitkari: दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. 28 जानेवारीला झालेल्या त्या भीषण विमान अपघाताबाबत नवनवीन खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
तर दुसरीकडे विधान परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव देखील घोषित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधान परिषदेसाठी माजी आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल मिटकरींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदा विधान परिषदेची संधी मिळाली नाही. त्यानंतर आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. "अजित दादांच्या मृत्यूचा तपास लागेपर्यंत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही, वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल. जान भी देंगे," अशा भावना मिटकरींनी व्यक्त केल्या आहेत.
Amol Mitkari: नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती दादा… हरकत नाही. दादा तुमच्यासाठी 'एक संधी' काय अशा 'हजार संधी' हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील. या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही, तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल. अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही. वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल. जान भी देंगे," असे त्यांनी म्हटले आहे.
Amol Mitkari: अघोरी पूजेचा धक्कादायक दावा
दरम्यान, दरम्यान, अमोल मिटकरी यांनी काही दिवसांपूर्वी दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. अमोल मिटकरींनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'बारामती मध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती व त्यांचे बारामतीला असलेले हस्तक या शिवाय हे होऊ शकत नाही, अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरत आहेत. डिसेंबर २८ डिसेंबर २०२५ रोजी विद्या प्रतिष्ठान ए आय इमारत बांधकामजवळ ही अघोरी पूजा मध्य रात्री मांडली होती आदरणीय दादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते', असे त्यांनी म्हटले होते.
तर दुसऱ्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी यांनी म्हटले होते की, खताळपट्टा काटेवाडी परिसरात दादांच्या बंगल्यासमोरील हे भयंकर दृश्य विमान अपघातापूर्वी या ठिकाणी बोकड उलटे टांगून खाली अघोरी पूजा केल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. चार महिन्यानंतर अशा अवस्थेत हे सर्व आढळलं. अंधश्रद्धा नाकारणाऱ्या दादांचा अंधश्रद्धा मानणाऱ्या लोकांनी कसा घात केला? हे भयंकर सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे. भय इथले संपत नाही, अशी पोस्ट त्यांनी केली होती.
Author : निलेश बुधावले, एबीपी माझा

