Analogue Paneer Ban In Maharashtra:महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बनावट पनीरच्या विक्रीवर धडक कारवाई करत राज्यात 'अॅनालॉग पनीर'वर (नॉन-डेअरी पनीर) वर्षभरासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यासंदर्भातील आदेश अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार कठोर कारवाई
हा बंदीचा आदेश अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 30(2)(अ) अन्वये लागू करण्यात आला आहे. एफडीएच्या नियमांनुसार 'पनीर' हा एक प्रमाणित अन्नपदार्थ असून त्यात दुधातील स्निग्धांश (Milk Fat) असणे अत्यंत आवश्यक आहे. दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा अन्य दुग्धेतर घटकांचा वापर करून तयार केलेले उत्पादन हे कायद्यानुसार 'दुग्ध संदर्भातील अॅनालॉग' ठरते. त्यामुळे अशा उत्पादनाला 'पनीर' नाव देऊन विकणे किंवा ग्राहकांना पुरवणे हा कायद्याने गंभीर गुन्हा मानला जाईल.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सवरही निर्बंध
- या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, क्लाऊड किचन आणि केटरर्सवर होणार आहे.
- वापरावर मनाई: कोणत्याही अन्नपदार्थात अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरचा वापर करणे, त्याची साठवणूक करणे, विक्री करणे किंवा ग्राहकांना ते सर्व्ह करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
- दिशाभूल थांबवण्याचा प्रयत्न: ग्राहकांना अस्सल पनीर असल्याचा भास निर्माण करून असे उत्पादन वापरणे ही शुद्ध दिशाभूल आहे.
- दंडात्मक कारवाई: नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उत्पादन 'मिथ्याछापित' मानले जाईल. अशा व्यावसायिकांवर कायद्यातील दंडात्मक तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, तसेच साठा जप्त करून तो नष्ट केला जाईल.
नियमित शुद्ध पनीरवर कोणतीही बंदी नाही
- या आदेशामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही. नियमानुसार ठरवून दिलेल्या मानकांचे पालन करणारे पनीर बाजारात उपलब्ध राहील.
- फुल-फॅट पनीर: निर्धारित निकष पूर्ण करणारे नियमित फुल-फॅट पनीर सैल (Open) किंवा पॅकबंद स्वरूपात विकता येईल.
- मीडियम व लो-फॅट पनीर: या श्रेणीतील पनीरची विक्री सीलबंद पॅकेजमध्ये आणि अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) विनियम, 2020 नुसार सर्व आवश्यक घोषणांसह करणे बंधनकारक आहे.
अॅनालाॅग पनीर म्हणजे काय आणि ते कसे ओळखायचे? (What is Analogue paneer)
अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर म्हणजे हुबेहूब अस्सल पनीरसारखे दिसणारे बनावट उत्पादन. यात दुधाऐवजी संपूर्णतः किंवा अंशतः वनस्पती तेल (Vegetable Oil), वनस्पती स्निग्धांश आणि इतर दुग्धेतर घटकांचे मिश्रण करून ते तयार केले जाते.
अॅनालॉग पनीर कसे ओळखायचे?
- लेबलची पाहणी: पॅकेटवर 'Analog Cheese/Paneer' किंवा 'Non-Dairy Product' असे नमूद केलेले असते.
- घटक (Ingredients): घटकांच्या यादीत दुधाऐवजी 'Vegetable Fat' किंवा 'Hydrogenated Oil' लिहिलेले आढळल्यास ते अॅनालॉग पनीर असते.
- पोत आणि चव: अस्सल पनीरच्या तुलनेत हे पनीर अधिक रबरासारखे ताणले जाणारे किंवा वेगळ्याच तेलकट पोताचे लागते.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : राजू सोनावणे

