Dailyhunt
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?

ABP माझा 2 weeks ago

Shivsena Operation Tiger: शिवसेना ठाकरेंच्या (Shivsena UBT) पक्षातील खासदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर (Operation Tiger) राबवले जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यात ठाकरेंच्या पक्षातील ७ खासदार (Shivsena MP) गळाला लागल्याची दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीमुळे शिवसेना (ठाकरे गट)मध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही नेत्यांसह खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचंही नाव घेण्यात आलं आहे, यावरून अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी संताप व्यक्त करत भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार असं ठामपणे म्हटलं आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, उद्धव सेनेतून शिंदे सेनेत कोण कोण जाणार त्या 8 जणांमध्ये माझा पण फोटो आहे. कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं देत होती. आज माझाही फोटो दिला. आमचं नशीब आहे की, अनिल देसाई यांचं नाव वगळलं आहे. या बातमीचा कडाडून निषेध करतो. देशातील जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. एका जरी ठिकाणी त्यांच्या पक्षाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेल तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन. एक लक्षात ठेवा मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे हे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात, त्या पक्षाचा मी शिवसैनिक आहे. मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या एका फोन कॉलवर मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार केलं. तर उद्धव ठाकरे यांनी मला खासदार केलं आहे. गद्दारांच्या बाबतीत काय विचार आहे हे समजून घ्या अगोदर, असंही अरविंद सावंतांनी म्हटलं आहे.

Arvind Sawant Shivsena: विकली जाणारी औलाद नाही

आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलो आहोत. भगवा घेऊन आलो आहे आणि जाताना भगवाच पांघरूण जाऊ. प्रत्येक खासदार हा ज्याच्या त्याच्या कामात आहे. त्यांच्या सोबत जे जे खासदार होते, त्याचा फोटो छापा मग. येत्या 24 तारखेला पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे यावर अंतिम सुनावणी आहे. मग अशा बातम्या सोडायच्या. कोर्टासमोर त्या मांडायच्या. विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण हे तुम्ही ओळखा. पन्नास खोके एकदम ओके हे कोण म्हणालं होतं? कबुल केले ना त्यांनी जाहीर सभेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी कबूल केले ना, जाहीर केलं ना. आम्ही विकली जाणारी औलाद नाही, अशी तिखट प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.

एवढ्यावरच न थांबता पत्रकारांसमोर अरविंद सावंतांनी पत्र लिहित आपण मेलो तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं म्हटलं आहे.

Arvind Sawant Shivsena: अरविंद सावंतांनी पत्रात काय लिहिलं?

"मी, अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य नेता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देत आहे की, मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेब ) यांचा निष्ठावंत शिवसैनिक असून, मला उभा चिरला जरी शिनसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, 'मातोश्री'शी असलेले नाते कधीही तोडणार नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, खरं तर मूळ शिवसेना पक्ष यांच्यासोबत प्रतारणा करणे म्हणजे 'आईच्या दूधाशी' प्रतारणा करणे आहे असे मी समजतो.....या वर्तमानपत्राने मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून मी दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली. त्याचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालांट लावले म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात करणार आहे," असा मजकूर सावंतांनी पत्रात लिहिला आहे.

Author : अंकिता खाणे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha