Dailyhunt
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट

ABP माझा 1 week ago

शिर्डी : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या फसवणूक प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिर्डीतील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा लागला असून, खरातने तब्बल 130 बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे.

(Ashok Kharat Case Nashik Crime News)

सर्व खात्यांमध्ये अशोक खरात यालाच 'नॉमिनी'

मिळालेल्या माहितीनुसार, 2021-22 या कालावधीत विविध व्यक्तींच्या नावाने पतसंस्थांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती. समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था यांसह अनेक ठिकाणी ही बनावट खाती तयार करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व खात्यांमध्ये अशोक खरात यालाच 'नॉमिनी' म्हणून दाखवण्यात आले होते. या खात्यांतून एका दिवसात लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.(Ashok Kharat)

जासूद आणि चाकणकर यांच्या भगिनी व पुतण्यांच्या नावानेही खाती

या बनावट खात्यांमधून एकूण व्यवहाराची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये काही प्रभावशाली व्यक्तींच्या नातेवाईकांच्या नावांचाही वापर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. जासूद आणि चाकणकर यांच्या भगिनी व पुतण्यांच्या नावानेही खाती उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर करण्यात आल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे.

दरम्यान, शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाली आहे. सावकारकी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू ठेवला असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलील कोठडी सुनावली. या सुनावणीसाठी अशोक खरात याला व्हीडीओ कॉनफरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले. अशोक खरातच्या सुरक्षेच्या कारणामुळे एसआयटीकडून अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याचा अर्ज केला होता. एसआयटीचा हा अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. आज अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची एसआयटीला परवानगी दिली. यावेळी कोर्टरुममध्ये 4 स्क्रीन लावण्यात आल्या. बीइन ईचपुरानी यांच्या कोर्टात आज अशोक खरातप्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

आजच्या ऑनलाईन सुनावणीत अशोक खरात उपस्थित राहिला, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला नाव विचारले. यावेळी आवाज कमी आल्यामुळे न्यायाधीशांनी अशोक खरातला मोठ्याने बोलण्यास सांगितले. तर पुढे सुनावणीत तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहे तेच तुमचे वकील आहेत का?, असं न्यायाधीशांनी विचारले. यावर हो असं अशोक खरातने उत्तर दिलं. त्यानंतर सुनावणीच्या शेवटी सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तुला काही बोलायचे आहे का?, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. यावर हात जोडून काही नाही, असं अशोक खरात म्हणाला. (Ashok Kharat Case Hearing Nashik)

Author : नितीन ओझा, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha