Dailyhunt
Ashok Kharat Case: धार्मिक कामासाठी अशोक खरातला आधार-पॅन कार्ड दिलं, पण त्याने...; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा ईडी चौकशीत खळबळजनक दावा, काय-काय म्हणाल्या?

Ashok Kharat Case: धार्मिक कामासाठी अशोक खरातला आधार-पॅन कार्ड दिलं, पण त्याने...; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा ईडी चौकशीत खळबळजनक दावा, काय-काय म्हणाल्या?

ABP माझा 3 days ago

Ashok Kharat Case: समता नागरी सहकारी पतसंस्थेतील मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपला फास अधिक घट्ट केला आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) यांची ईडी कार्यालयात सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली.

या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावा केलाय.

Ashok Kharat Case: "धार्मिक कार्यासाठी कागदपत्रे दिली, खरातने केला गैरवापर"

चौकशी दरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की,आपले आणि मुलाचे आधार-पॅन कार्डचे तपशील धार्मिक कामासाठी कॅप्टन खरातला दिले होते. या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने बनावट (बोगस) खाती उघडली, असा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या खात्यांमध्ये नॉमिनी (वारसदार) म्हणून खरातचे स्वतःचे नाव असून, खाते उघडताना मोबाईल क्रमांकही खरातचाच वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

Ashok Kharat Case: कॉल डिटेल्स आणि मेसेजेसचा 'डेटा' ईडीच्या हाती

प्रतिभा चाकणकर यांनी खरातशी संबंध नसल्याचा दावा केला असला तरी, तांत्रिक तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 या कालावधीत प्रतिभा आणि खरात यांच्यात तब्बल 230 पेक्षा जास्त कॉल्स आणि 200 हून अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याचे आढळले आहे. या संवादाची सध्या ईडीकडून कसून पडताळणी सुरू असून, यामुळे चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Case: 40 लाखांचा संशयास्पद परतावा?

ईडीच्या संशयानुसार, 2021 मध्ये जमा झालेले सुमारे 26 लाख रुपये एका विशेष खात्यात वळवण्यात आले होते. ही रक्कम 2024 पर्यंत तिथेच ठेवून त्यावर तब्बल 40 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत आढळलेली चाकणकर यांच्या नावावरील चार खाती ही खरातने चालवलेल्या 134 संशयित बोगस खात्यांपैकीच एक असल्याचा ईडीला संशय आहे.

Ashok Kharat Case: पुन्हा चौकशीची शक्यता

दरम्यान, या प्रकरणात केवळ प्रतिभा चाकणकरच नव्हे, तर त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही ईडीने समन्स बजावले आहे. तर अंदाजे 8 तास प्रतिभा चाकणकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून गरज पडल्यास त्यांना पुन्हा ईडीकडून चौकशीला बोलावले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha