Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक हादरवणारी माहिती समोर आली. अशोक खरातला आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.
त्याआधी एसआयटीकडून अशोक खरातच्या कार्यलयात तपास केला. यावेळी एसआयटीने अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून महत्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयातून एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A टू Z पर्यंत अक्षरं आणि 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थानचे कोरे पावती पुस्तक, भिंग काच आणि हिरव्या मळकट रंगाचे पातळ द्रव्य असलेली बाटली एसआयटीने जप्त केली आहे. (Ashok Kharat Case)
अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार- (Ashok Kharat Nashik District Sessions Court)
अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यात त्याची 7 दिवसाची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी तिसऱ्या गुन्ह्यात त्याला वर्ग करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन एसआयटीने पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यत त्याचा ताबा घेतला आहे. सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेला तिसरा गुन्हाही महिलचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहे. 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर अशोक खरातने अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची प्रसुती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल असे सांगत महिलेवर अत्याचार केला. त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवरच त्याने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली होती. याच अत्याचारच्या घटनेनंतर खरात चे बिंग फुटले आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले.
अशोक खरात बोगस आयकर अधिकारी पाठवून भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा- (Ashok Kharat Case Nashik Crime)
भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे. आतापर्यंत जादूटोणा, काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा अशोक खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे खरात, बोगस आयकर अधिकारी पाठवून, तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली. बोगस आयकर अधिकारी पाठवून खरातने स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता फसवणूक झालेले भक्त समोर येऊन तक्रार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार, VIDEO:
Author : मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा

