मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू ( Bacchu Kadu) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती.
मात्र आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत.बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. तर प्रहार संघटना आहे तशीच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Bacchu Kadu Join Shivsena: नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम मनरेगा (MGNREGS)मध्ये घ्यावं, हमीभावामध्ये ज्या सुधारणा हव्या आहेत, त्यांच्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणीमधील विधवा बहिणी तशाच आहेत. दिव्यांगांच मंत्रालय शिंदेंनी साहेबांनी स्थापित केलं त्याचं बळकटीकरण झालं नाही, हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतर हा निर्णय घेतो आहे, बच्चू कडूचं काम प्रामणिक राहिलं, शिवसेनेची राजकीय ताकद मजबुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांची ताकद, दिव्यांगांची ताकद, मला हवी आहे, त्याच्या बदल्यात कोणताही समझोता होणार नाही, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहत असेल तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईमध्ये एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल, यासाठी जसा माझ्या शरीरातील रक्तांचा प्रत्येक थेंब शिवसेनेसाठी धावणार आहे, तसाच माझ्या शेतकऱ्यांसाठी देखील धावणार आहे, कारण समझोता शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी होऊच शकत नाही. राजकीय प्रवास आम्ही शिवसेनेतून केला होता. माझ्याजवळ अजूनही पत्र आहे बाळासाहेब ठाकरेंना लिहलेलं, त्यामध्ये कर्जमाफी करावी, आणि काही मुद्दे होते, आम्ही तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता, त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि दिव्यांगाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन, तो माझ्या शेतकरी, मजूर यांच्यासाठी मी लढणार आहे, असंही पुढे बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे.
Bacchu Kadu Join Shivsena: मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो
पुढे बच्चू कडू म्हणाले की, मला मंत्रीपदाचं काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रीपद हवं असतं तर मागे गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हाच मागितलं असतं ना, आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलो आहे, लोक मंत्रीपदासाठी फिंल्डींग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो, हाच फरक आहे, बच्चू कडूचा हे समजून घ्या, असंही कडूंनी म्हटलंय. आता जे घडतंय ते माझ्या ध्यानीमनी देखील नव्हतं, मला काहीच माहिती नव्हती, मी संत्र्याला पाणी देत होतो, तुमच्या बातम्या आल्या सुत्रांनी सांगितलं फोन केला हे केलं, इथंपर्यंत मी येण्याचं श्रेय हे मी माध्यमांना देतो, विधान परिषद माझ्या कानावर देखील नव्हती, हे कानावर टाकण्याचं काम माध्यमांनी केलं असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
२४ तासात एकनाथ शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, तो होत असेल तर विरोध काय असंही पुढे कडू म्हणाले, संघटना या काळात चालवणं फार कठिण आहे, माझं काम आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणं, जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा असंही कडू पुढे म्हणाले. प्रहार संघटना राहिलं, ज्याला सामाजिक काम करायचं आहे, त्यासाठी प्रहार राहिलं, तर राजकीय इच्छुकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा पर्याय त्यांनी दिला आहे.

