Baramati by election 2026 Sharad Pawar: बारामतीच्या पोटनिवडणुकीत विनंती करुनही काँग्रेस पक्षाने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीशी नाराजी आहे.
याच मुद्द्यावरुन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी काँग्रेसविषयी तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार उतरवणे म्हणजे काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर काहीवेळातच झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकप्रकारे आपल्या नातवाचे कान टोचून त्याचे हवेतील विमान जमिनीवर आणले. (Maharashtra Politics news)
शरद पवार यांना पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्या काँग्रेसविषयीच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. संजय राऊत बोलतात की, काँग्रेसने स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे. पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की, काँग्रेसचा आता डाऊनफॉल सुरु होईल, त्यांनी उमेदवारी अर्ज भरुन चूक केली, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा शरद पवार थोडावेळ थांबले. त्यानंतर काहीशा छद्मीपणे हसून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही निर्णयांवर स्टेटमेंट करायला एकप्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही. हे वक्तव्य करुन शरद पवार यांनी पार्थ पवार यांना कोणतेही राजकीय भाष्य करताना ते जबाबदारीने आणि तर्कसंगत करावे, अशा अप्रत्यक्ष संदेश दिल्याची चर्चा आहे. यावर आता पार्थ पवार काही प्रतिक्रिया देणार का, हे बघावे लागेल.
Parth Pawar news: पार्थ पवार नेमकं काय म्हणाले?
माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला (त्यांना) कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या (काँग्रेसच्या) राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहिती. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय. त्यांनी (काँग्रेसने) विचार केला असेल तर करु द्या. पण त्यांना (काँग्रेसला) नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत थेट इशाराच दिलाय.
लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असेही पार्थ पवार यांनी म्हटलं.

