Beed Gram Panchayat Election 2026: मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक (Massajog bypoll Sarpanch Election) बिनविरोध व्हावी यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असतानाच आता या निवडणुकीच्या रिंगणात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांची एन्ट्री झाली आहे.
मला सरपंच पदाचे उमेदवार केलंय, असेच ही निवडणूक बिनविरोध होईल, असे ते म्हणाले आहेत. स्वरूपानंद देशमुख हे आज (9 एप्रिल) दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मला सगळं गाव म्हणत असेल बिनविरोध करा, तर ठीक आहे. पण तुम्हाला 29 तारखेला सगळं कळेल. गावात 2284 मतदान आहे. देशमुख कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईत आम्ही सोबत आहोत. मी पण गावचा माणूस आहे. मलाही बिनविरोध निवडून दिले पाहिजे असेही स्वरूपानंद देशमुख (Swarupanand Deshmukh) म्हणाले.
Ashwini Deshmukh: निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, अण्णांचे जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार
अशातच, मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी देखीलआज (9 एप्रिल) आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशमुख कुटुंबीयांनी एकमताने आणि ग्रामस्थांशी विचार विनिमय, चर्चा करुन अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केलं आहे. त्यानुसार, आज सकाळी 11.00 वाजता सरपंच पदासाठी त्या आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंच पद रिक्त झाले होते. आता, नव्याने गावचा कारभार हाती घेणाऱ्या नवीन सरपंचांचा कालावधी 18 महिने इतका असणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, अण्णांचे जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार, अशीप्रतिक्रिया आश्विनी देशमुख यांनीदिलीआहे.
Beed Gram Panchayat Election 2026: लोकशाही असल्याने प्रत्येकाला अर्ज दाखल करण्याचा अधिकार - आश्विनी देशमुख
ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती आणि आमच्यावर निवडणुकीची वेळ यायलाच नको होती. संतोष अण्णांचे जे स्वप्न आहे ते आम्ही दीड वर्षात पूर्ण करणार आहोत. गावात पाण्याची टंचाई होऊ नये, कुणाला काही अडचण येऊ नये, अण्णांनी काम केले आहे. तेच आम्ही पुढे करणार आहोत. गावांनी ज्या प्रकारे लढा उभा केला आहे, त्याच प्रकारे आम्ही गावाचा विकास करू. गावाने आम्हाला साथ द्यावी. स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना लोकशाही असल्याने प्रत्येकाला अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचे आश्विनी देशमुख म्हणल्या आहेत.
Dhananjay Deshmukh : फोटोलाच भाऊ समजून मी हे काम करत आहे
दरम्यान, सरपंच पदाच्या या निवडणुकीसाठी आज आश्विनी देशमुख आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच स्वरूपानंद देशमुख यांची या निवडणुकीत एन्ट्री झाली असतानाच यावर धनंजय देशमुख यांनी भाष्य केले आहे. केज तहसीलदारांच्या अपघाती निधनामुळे आज आम्ही साध्या पद्धतीने आमचा उमदेवारी अर्ज दाखल करणार आहोत. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ज्याचा माणूस गेला त्यालाच ते दुःख कळते. आमच्या वहिनी अश्विनी देशमुख यांच्यासोबत संपूर्ण गावांनी रावा आणि गावाचा विकास करून घ्यावा, असे आमचे आवाहन असणार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अर्ज भरण्याचा अधिकार आहे, असे म्हणत स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीवर बोलणे टाळले आहे. दलित व्यक्तीला मारहाण झाली, त्यावेळेस धावून जाणारा आमचा भाऊ आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करायचा आहे. फोटोलाच भाऊ समजून मी हे काम करत आहे. संतोष देशमुख यांनी कुठल्याच गोष्टीचा गाजावाजा केला नाही. गेले दीड वर्ष आम्ही न्यायासाठी लढत आहोत. मात्र त्याचा कोणी उपयोग करत असेल तर ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याला समजते. असेहीतेम्हणाले.
Author : स्वानंद पाटील

