Dailyhunt
Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2: 'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व का नाकारलं?  भाऊ कदमांनी कारण स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...

Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2: 'चला हवा येऊ द्या'चं दुसरं पर्व का नाकारलं? भाऊ कदमांनी कारण स्पष्टच सांगून टाकलं, म्हणाले...

ABP माझा 1 week ago

Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2: संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). महाराष्ट्रातील प्रत्येकानं या कार्यक्रमावर आणि कार्यक्रमात झळकलेल्या प्रत्येकावर भरभरुन प्रेम केलं.

तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण, काही महिन्यातच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नवं पर्व आलं खरं, पण नव्या बदलांसह. बऱ्याच अंशी कार्यक्रमाचा बाज तोच जुना होता, पण एक महत्त्वाची बाब नव्या पर्वात नव्हती, ती म्हणजे, 'चला हवा येऊ द्या'च्या (Chala Hawa Yeu Dya) ज्या टीमवर सर्वांनी भरभरुन प्रेम केलं, ती टीम नव्या पर्वात नव्हती. यावरुन संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चांना उधाण आलेलं. विविध तर्क-वितर्क लावले जाऊ लागले.

झी मराठीवर 'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व आलं खरं, पण त्या नव्या पर्वात प्रेक्षकांची लाडकी 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम दिसली नाही. निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) नव्या पर्वात दिसले नाहीत. यावरुन अनेक चर्चा झाल्या. तर्क-वितर्क लावले गेले. कुणी म्हणालं की, 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस आहे. तर कुणी म्हणालं, पण, नेमकं काय झालेलं हे दोघांपैकी कुणीच समोर येऊन सांगितलं नव्हतं. अखेर आता कित्येक महिन्यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या पर्वातली टीम दुसऱ्या पर्वात का दिसली नाही? यावर त्याच टीममधील स्टार कॉमेडियन भाऊ कदम (Bhau Kadam) यांनी मौन सोडलं आहे.

'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वाबाबत काय म्हणाले भाऊ कदम? (Bhau Kadam On Chala Hawa Yeu Dya Season 2)

'सागर खापले अरे बापरे' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेते भाऊ कदम म्हणाले की, "निलेश साबळे आधी फु बाई फु कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचा.... त्यानंतर तो लिहायला लागला. झी मराठीनं जेव्हा 'चला हवा येऊ द्या' सुरू केलं, तेव्हा मग त्यानं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलं... तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि तो मला खूप मानतो... तो कायम त्याच्या कामात असतोच आणि त्याचं कामावर खूप प्रेम आहे... निलेश साबळेला मित्रही कमी आहेत. त्याचा चंद्रकांता नावाचा सिनेमाही येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. कामाच्या बाबतीत त्याला मी पाहिजे आणि मी पण त्याच्याबरोबर काम करतो..."

"'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम शेवटी शेवटी वाहिनीनं बंद करायचं ठरवलं... आम्ही म्हटलं तीन महिन्यांसाठी कार्यक्रम बंद आहे, ठीक आहे. परत चालू करणार आपण... पण सात आठ महिने नाही होणार... कारण घर वैगरे सगळं आहेच. शेवटी दुसरं पर्व सुरू करायला सात आठ महिने गेले... एवढे दिवस थांबणं मलाही जमणारं नव्हतं आणि निलेशलाही... परत कळलं दुसरा सीझन येतोय. तेव्हा निलेश म्हणाला, तो नाही करत... मग मी पण नकार दिला. कारण लिहिणारच कोण नाही ना. केलंही असंत, पण ती मज्जाच नसती आली. कारण त्यानं जे करुन ठेवलंय आतापर्यंत ते स्टॅडर्ड पाहिजे ना, परत कुणीतरी दुसरा आला, त्यानं लिहिलं आणि ते स्टॅडर्ड खाली गेलं, तर काय मज्जा? दुसऱ्या पर्वात त्यांच्या परीनं त्यांनी केलं, पण मी नाही केलं. त्यानंतर निलेश होता म्हणून मी झी मराठीच्या अवॉईस मध्ये सहभागी झालो...", असं भाऊ कदम म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha