BJP: आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक (Organizational) बांधणी लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरुवारी (28 मे) एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने एकाच वेळी चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष (State Presidents) बदलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
यामध्ये दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab) आणि त्रिपुरा (Tripura) या राज्यांचा समावेश आहे.
दिल्लीत वीरेंद्र सचदेवा यांच्या जागी थेट केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा (Harsh Malhotra) यांच्याकडे दिल्ली भाजपची कमान सोपवण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्षपदी नियुक्ती केली असून, हा निर्णय तातडीने लागू करण्यात येत आहे."
Harsh Malhotra: कोण आहेत दिल्लीचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्ष मल्होत्रा?
हर्ष मल्होत्रा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीतील खासदार (MP) आहेत. सध्या ते केंद्र सरकारमध्ये मंत्री (Union Minister) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. दीर्घकाळापासून पक्ष संघटनेत सक्रिय असलेल्या मल्होत्रा यांनी दिल्ली भाजपमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांचे जनसंपर्क आणि संघटन कौशल्य उत्तम मानले जाते.
Archna Gupta: हरियाणात डॉ. अर्चना गुप्ता यांच्याकडे नेतृत्व
डॉ. अर्चना गुप्ता यांची हरियाणा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अर्चना गुप्ता या हरियाणातील एक आक्रमक आणि सक्रिय महिला नेत्या आहेत. पक्षाच्या संघटनात्मक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. महिला नेतृत्व बळकट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, आता त्यांच्या नेतृत्वाखाली हरियाणात पक्ष विस्ताराला गती मिळण्याची पक्षाला अपेक्षा आहे.
Keval Singh Dhillon: पंजाबमध्ये उद्योगपती केवल सिंह ढिल्लों यांच्यावर विश्वास
पंजाब भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा केवल सिंह ढिल्लों(Keval Singh Dhillon) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ढिल्लों हे बरनाला येथून दोनदा आमदार (MLA) म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी 2922 ची संगरूर लोकसभा पोटनिवडणूक आणि 2024 ची बरनाला विधानसभा पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. ढिल्लों हे पंजाबमधील एक मोठे उद्योगपती असून ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. बरनालामध्ये त्यांना 'विकास पुरुष' म्हणून ओळखले जाते.
Abhishek Debroy: त्रिपुरात अभिषेक देबरॉय यांच्या खांद्यावर धुरा
ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय (Abhishek Debroy) यांना भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. देबरॉय हे त्रिपुरा भाजपमधील एक तरुण आणि सक्रिय चेहरा आहेत. त्यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनेत तळागाळात पातळीवर काम केले असून, पक्षाचे अनेक महत्त्वाचे अभियान यशस्वी केले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे त्रिपुरात पक्षाचा जनाधार आणखी वाढेल, असा विश्वास केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील बातम्या; पाहा व्हिडीओ

