BJP vs MNS in Mumbai: पुण्यातील महाविद्यालयात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढायला लावल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजप युवा मोर्चाच्यावतीने मुंबईत मनसेच्या (MNS) विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर येऊन आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच मोठ्या संख्येने मनसेचे (MNS) कार्यकर्ते आणि पदाधिकारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरासमोर एकत्र आले होते. आपण भाजप च्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यास उभे आहोत. भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी इथे यावेच त्यांना मनसे स्टाईलने उत्तर मिळेल, असा पवित्रा मनसेने घेतला होता. मनसेचे संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे यांच्यासह मुंबई आणि नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या घराबाहेर ठाण मांडून उभे होते. भाजपचे कार्यकर्ते कधी याठिकाणी येतात, याची हे सर्वजण वाट पाहत होते. मात्र, बराचवेळ उलटूनही भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते याठिकाणी न आल्याने त्यांनी आम्हाला जागा सांगावी, आम्ही तिकडे येतो, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
मनसे कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज शिवाजी पार्कच्या परिसरात उभी असल्याने कृष्णराज महाडिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नाही. कृष्णराज महाडिक हे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह माहीम आणि माटुंग्यातून राज ठाकरे यांच्या घराकडे येणार होते. मात्र, मनसे आणि भाजयुमोचे कार्यकर्ते भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दादर आणि माहीम दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावला. कृष्णराज महाडिक यांनी पोलिसांचा डोळा चुकवून माहीम येथून शिवतीर्थकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अमित ठाकरेने तमाशा केला, त्याचा विरोध म्हणून इथे आलो आहोत. पंतप्रधान मोदी असतील, राष्ट्रपती यांचा प्रोटोकॉलप्रमाणो फोटो लावणे बंधनकारक असते, असे त्यांनी म्हटले.
कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोचे कार्यकर्ते माटुंगा आणि माहीम परिसरात असल्याचे समजताच मनसेच्या काही नेत्यांनी तुकड्या करुन उलट भाजयुमोला गाठण्यासाठी माहीम आणि माटुंगा परिसर गाठला. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना भिडू दिले नाही. मनसेचे गजानन काळे आणि इतर काही कार्यकर्ते बेधडकपणे भाजयुमोचे कार्यकर्ते असलेल्या माटुंगा परिसरात शिरले. मात्र, पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. सध्या संदीप देशपांडे, अविनाश जाधव हे दोघेही राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आहेत. राज ठाकरेंच्या कट्टर कार्यकर्त्यांची इतकी मोठी फौज तैनात असल्याने तुर्तास भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे घर सोडाच पण शिवाजी पार्कची वेसही ओलांडता येण्याची शक्यता फार कमी दिसत आहे.

