Krishnaraj Mahadik and Ravindra Chavan: अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो उतरवायला लावल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप युवा मोर्चाकडून (BJP Yuva Morcha) मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याची मोहीम आखली होती. मात्र, मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) घराभोवती तयार केलेल्या अभेद्य तटबंदीमुळे कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे घर तर सोडाच पण शिवाजी पार्कची वेसही ओलांडता आली नव्हती. मनसे (MNS) आणि भाजयुमोचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कृष्णराज महाडिक यांना माहीम परिसरातूनच ताब्यात घेतले होते. एकूणच हे आंदोलन फसल्याने कृष्णराज महाडिक यांनी स्वत:ची शोभा करुन घेतली होती. हे कमी होते की काय म्हणून आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कृष्णराज महाडिक यांचे कान टोचले आहेत. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर चव्हाणांनी नापसंती व्यक्त केली. (Maharashtra politics news)
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल आलेला पोरगा काही तरी बोलतो आणि आपण त्याविरोधात आंदोलन करतो हे चुकीचे आहे, असे चव्हाण यांनी म्हटले. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर व्यासपीठावरून चव्हाणांनी युवा मोर्चाला सुनावले. तुम्ही आणि मी सर्वजण पाहता, ते कालचं पोरगं कायतरी बोलतं, कोणतरी ते ऐकतं आणि कोणतरी जाऊन ती तसबिरी काढतं, याविरोधात आपण आंदोलन करायला नव्हते पाहिजे. माझी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, नका आंदोलनं करु. हे काय करतायत, हे लक्षात घ्या. हे चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत. मीच तो कार्यकर्ता आहे, मीच तो पदाधिकारी आहे. मला युवाशक्तीला कुठेही अडचणीत आणायचं नाही. आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, गुंड म्हणून तयार करायचे नाही, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले. यामुळे आता भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यावर दुहेरी नामुष्की ओढावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अमित ठाकरे हे सोमवारी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला होता. यावर अमित ठाकरे यांनी आक्षेप घेत, महाराजांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो कसा लावला? असा जाब विचारला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो खाली उतरवला होता. याप्रकरणी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटकही केली होती.

