Dailyhunt
Deool Band 2: 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वामी पुन्हा येणार; प्रवीण तरडेंच्या देऊळ बंद 2 च्या प्रदर्शनाची तारीख समोर; प्रमुख भूमिकेत कोण?

Deool Band 2: 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वामी पुन्हा येणार; प्रवीण तरडेंच्या देऊळ बंद 2 च्या प्रदर्शनाची तारीख समोर; प्रमुख भूमिकेत कोण?

ABP माझा 1 week ago

Deool Band 2: देऊळ बंद या 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तब्बल 11 वर्षांनी देऊळ बंदचा दुसरा भाग (Deool Band 2) प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाने, प्रेक्षकांच्या मनात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलं होतं. हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. 2015 नंतर या चित्रपटाचा आणखी एक भाग यावा अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. त्यानंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देऊळ बंद 2 ची घोषणा करण्यात आलीय. लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी 'या सिनेमाचं डिजिटल पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केलंय. वटवृक्ष एंटरटेनमेंटची निर्मिती असणारा 'देऊळ बंद 2' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. हा चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर झालं.

11 वर्षांनी स्वामी पुन्हा येणार

लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्या सगळ्याच सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर 2 या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेलं. अकरा वर्षांनंतर स्वामी पुन्हा येणार असं म्हणत प्रविण यांनी चित्रपटाचे डिजिटल पोस्टर चाहत्यांसमोर आणले आहे. अकरा वर्षांपूर्वी स्वामी राघव शास्त्रीला भेटायला आले. आता अकरा वर्षांनी स्वामी पुन्हा येणार आहेत. पण कोणासाठी ? का ? आणि कधी ? त्याचीच ही तारीख 21 मे 2026. असं लिहित सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. जात 2015 पासून प्रेक्षकांसमोर आलेले चित्रपट आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद दाखवण्यात आलाय.

वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित 'देऊळ बंद 2'या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळबंद' या चित्रपटात गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे, गिरीजा जोशी, मोहन जोशी, मोहन आगाशे, सुनील अभ्यंकर यांनी भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमात प्रमुख भूमिकांची नावं अजून समोर आली नसली तरी हे डिजिटल पोस्टर पाहून चहात्यांच्या आतुरता वाढली आहे. पहिलाच भाग एवढा सुंदर होता, आता दुसरा भाग कधी येतो याची वाट पाहत आहोत अशा प्रकारच्या कमेंट्स या पोस्टखाली चाहते करत आहेत.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha