Dev Chaudhary Controversy In DPL : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (DPL) देव चौधरीला मिळालेल्या संधीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ऑक्शनमध्ये नाव नसतानाही देव चौधरीला न्यू दिल्ली टायगर्स संघाने आपल्या ताफ्यात स्थान दिल्याने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या (DDCA) निवड प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, मैदानावरील त्याच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची चर्चा अधिक रंगली आहे. या प्रकरणानंतर DDCA ने ऑक्शननंतर फ्रँचायझींना आपल्या पसंतीचे तीन खेळाडू संघात घेण्याची परवानगी देणाऱ्या नियमाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, संबंधित खेळाडूने DDCA लीगमध्ये किमान पाच सामने खेळलेले असणे आवश्यक होते. मात्र, या नियमाचा वापर नेमका कशा पद्धतीने करण्यात आला, यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
ऑक्शनमध्ये नाव नव्हतं, तरी संघात एन्ट्री
दिल्ली प्रीमियर लीगमधील आठ संघांपैकी न्यू दिल्ली टायगर्सने देव चौधरीला आपल्या संघात स्थान दिले. विशेष म्हणजे, देवचे नाव लिलावात नव्हते. त्यामुळे ऑक्शनमध्ये सहभागी न झालेल्या खेळाडूला संघात घेण्याचा आधार काय होता, असा थेट सवाल उपस्थित करण्यात येत आहे. न्यू दिल्ली टायगर्सची स्पर्धेतील कामगिरीही विशेष राहिलेली नाही. संघाने 10 सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळवला असून गुणतालिकेत शेवटचे स्थान गाठले आहे.
देव चौधरीला संघाने दोन सामन्यांमध्ये सलामीला पाठवले. साऊथ दिल्ली सुपरस्टार्जविरुद्ध तो अवघ्या 2 चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. त्यानंतर वेस्ट दिल्ली लायन्सविरुद्ध त्याने 24 चेंडूंमध्ये 16 धावा केल्या. या सामन्यात त्याच्या फलंदाजीच्या शैलीवरही प्रश्न उपस्थित झाले. विशेषतः पॉवरप्लेमध्ये फिरकीपटूविरुद्ध त्याने सलग पाच डॉट बॉल खेळल्याने त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेवर चर्चा रंगली.
क्लब क्रिकेटमधील कामगिरीवरही प्रश्न
देव चौधरीच्या क्रिकेटिंग पार्श्वभूमीबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याने दिल्ली अंडर-19 संघाच्या ट्रायलमध्ये सहभाग घेतल्याचे सांगितले जाते. एका क्लबशी संबंधित सूत्राच्या माहितीनुसार, त्याने स्पोर्टिंग क्लबकडून काही लीग सामने खेळले होते. मात्र, त्याची कामगिरी समाधानकारक नसल्याने त्याला पुढे संधी देण्यात आली नाही. अशा परिस्थितीत DPL सारख्या मोठ्या व्यासपीठावर त्याला संधी कशी मिळाली, हा चर्चेचा मुख्य मुद्दा बनला आहे.
'क्रिकेटमधील सर्वात मोठा स्कॅम' अशी चर्चा
ऑक्शनमध्ये नाव नसलेला खेळाडू, निवडीसाठी असलेला नियम, त्यानंतर मिळालेली DPL मधील संधी आणि मैदानावरील अपेक्षेप्रमाणे न झालेली कामगिरी या सगळ्या घटनांमुळे देव चौधरी प्रकरण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. मात्र, या प्रकरणाला स्कॅम म्हणण्यापूर्वी DDCA च्या अधिकृत चौकशीचा निष्कर्ष समोर येणे महत्त्वाचे आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणामुळे DDCA च्या खेळाडू निवड प्रक्रियेतील पारदर्शकता आणि नियमांच्या अंमलबजावणीवर मात्र नक्कीच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोण आहे देव चौधरी?
काही युजर्सनी दावा केला आहे की, देव चौधरी हा दिल्ली प्रीमियर लीग 2026 साठी झालेल्या ऑक्शनचा भाग नव्हता. मात्र, फ्रँचायझीने त्याला 1 लाख रुपयांच्या रकमेसह आपल्या संघात सामील केल्याचे म्हटले जात आहे. एका युजरने असा दावा केला की, देव चौधरी हा एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याला व्यवस्थित धावता येत नाही, तसेच त्याची कॅच पकडण्याची शैलीही पाहण्यासारखी आहे, असा टोमणाही या युजरने लगावला. असे असतानाही तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळत असल्याने सोशल मीडियावर त्याच्या निवडीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Author : किरण महानवर

