Disha Salian Death Case High Court Result: मनोरंजनविश्वापासून अगदी राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारं दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) निकाल दिलाय.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय अधिकारी नियुक्तीचे आदेश (Orders For Appointment Of CBI Officers) दिले आहेत. तसेच, या प्रकरणी BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत न्यायालयानं निकाल जाहीर केला. या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झालेली आणि मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयानं पोलिसांना या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्याचे निर्देशही दिले आहेत.
न्यायालयानं सुनावलेला निकाल दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. त्यांनी एफआयआर (FIR) नोंदवून नव्यानं तपास केला जावा, आणि विशेषतः हा तपास सीबीआयमार्फत (CBI) केला जावा, अशी मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी, 28 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली होती आणि न्यायालयानं एफआयआर नोंदवण्याच्या मागणीबाबत सतीश सालियन यांच्या याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवला होता.
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिशाच्या वडिलांची बाजू मांडणारे वकील काय म्हणाले? (Disha Salian Death Case Marathi News)
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील निलेश ओझा यांनी सांगितलं की, "न्यायालयानं सीबीआयला सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याचे, एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आणि तपासासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मालवणी पोलीस ठाण्याला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं सीबीआयकडे सोपवण्यास सांगितलंय. याशिवाय, पुराव्यांवरून ज्यांचं नाव समोर येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याउलट, ज्यांच्याविरुद्ध पुरावा नसेल, त्यांना आरोपी केलं जाणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. तसेच, जर सीबीआयनं नकारात्मक अहवाल सादर केला, तर त्यावर आक्षेप घेण्याचा आणि प्रोटेस्ट पिटिशन (Protest Petition) दाखल करण्याचा अधिकार आम्हाला (दिशाच्या वडिलांना) राहील. न्यायालयानं आपल्या आदेशात हे स्पष्टपणे नमूद केले आहे. मी न्यायालयाचे आभार मानतो..."
दिशाच्या वडिलांनी याचिकेत केलेले गंभीर आरोप (Disha Salian Death Case Marathi News)
सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत गंभीर आरोप केले होते. त्यांची मुलगी दिशा हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा दावा त्यांनी केला होता. या आधारावर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, दिशा सालियन या सुशांत सिंग राजपूतच्या माजी व्यवस्थापक होत्या. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी या घटनेकडे आत्महत्येची घटना म्हणून पाहिले आणि अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली होती.
नेमकं प्रकरण काय? (Disha Salian Death Case)
दिशा सालियनच्या गूढ मृत्यूचे प्रकरण अतिशय गाजलेले आणि वादग्रस्त आहे. 2022 मध्ये महाराष्ट्र विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. शिवसेनेचे (शिंदे गटाचे) आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. या मुद्द्यावरून सभागृहात आमदारांमध्ये बराच गोंधळ झाला होता. या प्रकरणात, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही केली होती. दिशा सॅलियन एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंग राजपूत, भारती सिंग सारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले. दरम्यान, दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल... VIDEO
Author : अभिषेक मुठाळ

