DK Shivkumar Karnataka Government बंगळुरु : कर्नाटकमध्ये सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आलेला आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी काल सिद्धारामय्या यांचा राजीनामा स्वीकारला होता.
आता डीके शिवकुमार यांच्या नेतृत्त्वात नव्या सरकारच्या स्थापेनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डीके शिवकुमार यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली आहे.
डीके शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कोण कोण मंत्री होणार?
काँग्रेसकडून नव्या सरकारमध्ये अनुभवी आणि प्रादेशिक संतूलन साधण्याचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. सूत्रांनुसार वरिष्ठ नेते आणि तरुणांना संधी दिली जाऊ शकते. संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे, त्यात प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. यतीन सिद्धारामय्या, दिनेश गुंडू राव, लक्ष्मी हेब्बाळर, रामलिंगा रेड्डी, रिजवान अरशद, यू.टी. खादर, शरथ बाचेगौड, ए.एस. पोन्नन्ना, बायराथी सुरे यांच्या समावेश आहे. याशिवाय प्रियांक खरगे, एम.बी. पाटील, जी. परमेश्वर, कृष्णा बायरेगौडा, ईश्वर खंड्रे, के.जे. जॉर्ज, एच.सी. महादेवप्पा आणि संतोष लाड या नेत्यांच्या नावांचा समावेश डीके शिवकुमार यांच्या सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळात असू शकतो, असं म्हटलं जातंय.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज सायंकाळी बैठक
कर्नाटकमध्ये आज सायंकाळी चार वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांचं लक्ष डीके शिवकुमार यांच्याकडे लागलं आहे. डीके शिवकुमार यांनी काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत शिवकुमार यांनी खरगे यांचे आशीर्वाद घेतले होते. आजच्या बैठकीत काँग्रेस विधिमंंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणं प्राथमिकता असेल.
सिद्धारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सिद्धारामय्या यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. आजच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याची निवड केली जाईल. डीके शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर तेच मुख्यमंत्री होतील. त्यामुळं आजच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचं अध्यक्षपद सिद्धारामय्या यांच्याकडे असेल. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार, काँग्रेस महासचिव आणि कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला, विधानपरिषदेतील गटनेते एनएस बोस राजू आणि काँग्रेसचे सर्व कार्यकारी अध्यक्ष उपस्थित असतील. ही घोषणा काँग्रेस आमदार आणि विधिमंडळ पक्षाचे सचिव अल्लामा प्रभू पाटील यांनी केली होती. सर्व आमदार , विधानपरिषद आमदार, लोकसभा खासदार आणि राज्यसभा खासदार या बैठकीला उपस्थित असतील.
Author : युवराज जाधव

