Eknath Shinde on Pune Nasrapur Bhor Crime: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून (Pune Nasrapur Bhor Crime) संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र, आरोपीने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुराने नसल्यानं तो 2 वेळा निर्दोष सुटला आहे. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करुन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन दिल. (Eknath Shinde on Pune Nasrapur Bhor Crime)
एकनाथ शिंदे पीडित मुलीच्या वडिलांना काय म्हणाले? (Eknath Shinde on Pune Nasrapur Bhor Crime)
फार दुर्दैवी वाईट घटना घडलेली आहे आणि आपण एकाच परिवारातले आहोत. मी कालपासून-परवापासून एसपी, पोलीस या सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्या आरोपीला जिवंत राहायचं अधिकार नाही आणि झालेली घटना तर अतिशय दुर्दैव आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही लोक तरी स्वस्थ बसणार नाही एवढं फक्त विश्वास तुम्हाला देतो, असं एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना सांगितले. सांत्वन करतानाही माझ्याकडे शब्द नाही. तुमच्या पोटचा गोळा गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी घटना एकदम माणुसकीला कलंक आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. एवढा विश्वास ठेवा की तो आरोपी जिंवत राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना दिला. तर पीडितेच्या वडिलांनी एक म्हणणं मांडलं, ते म्हणाले की, जसं योगी सरकार निर्णय घेतात, तसेच महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यायला हवा. आरोपी तीन महिने, सहा महिने, एक वर्षे, दोन वर्षे जगताच कामा नये, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime)
मी काल स्वत: पीडितेच्या वडिलांशी दोनवेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं, आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करुन घ्यायची आहे. त्यासाठी वेळेत चार्जशीट दाखल होणे आणि केस चालणे, माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेत आहोत. लोकशाहीत आपल्या सगळ्यांना वाटतं, अशा नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. पण ते लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते. पण कोणालाही कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये, यादृष्टीने कोणताही कोणतीही पळवाट न ठेवता या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न राज्य सरकार करेल. न्यायालयातून हे प्रकरण वेगाने मार्गी लावले जाईल. तसे पत्र आम्ही पीडीतेच्या कुटुंबाला दिले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं? (Pune Nasrapur Bhor Crime)
सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं.

