Film Producer Struggle Life: बॉलिवूडचे (Bollywood News) अनेक प्रोड्यूसर्स आहेत, ज्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आणि कोट्यवधींचं साम्राज्य उभारलं. पण, त्यापैकी बरेचजण असेही आहेत, ज्यांनी एका गोष्टीमुळे सगळं कमावलेलं गमावलंही.
आम्ही बोलतोय, 'कूली नंबर 1' (Coolie No. 1), 'हीरो नंबर 1' (Hero No. 1) आणि 'बीवी नंबर 1' (Biwi No.1) यांसारख्या हिट फिल्म्सचा प्रोड्युसर वासु भगनानी (Vashu Bhagnani) यांच्याबाबत. वासु भगनानी यांनी आज कोट्यवधींचं साम्राज्य उभारलंय. पण तुम्हाला माहितीय का? कधीकाळी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभं राहून साड्या विकलेल्या. अनेक छोटी-मोठी काम केलेली. नुकत्याच 'जिंगाबाद' (Zingabad) पॉडकास्टमध्ये बोलताना वासु भगनानी यांनी आपल्या इंडस्ट्रीतल्या करिअरबाबत सांगितलं. त्यांनी आपल्या सुरुवातीचा संघर्ष, बिजनेस वेंचर्स आणि त्यांच्या आयु्ष्याला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या त्या घटनेबाबत मनमोकळेपणानं सांगितलं. वासु भगनानी यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत अनेक गोष्टी, किस्से सांगितले.
रस्त्याच्या कडेला उभं राहून साड्या विकल्या... (Vashu Bhagnani Life Story)
वासु भगनानी म्हणाले की, "मी रस्त्याच्या कडेला साड्या विकायचो. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी रस्त्यावर साड्या विकणाऱ्या एका मुलानं इथपर्यंत मजल मारणं, ही खरोखरंच एक प्रचंड मोठी कामगिरी आहे. ही आठवण त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलांसाठी कायमस्वरूपी एक अनमोल ठेवा बनून राहील..." त्या काळात, त्यांचे कुटुंब कोलकाता येथे वास्तव्यास होते, जिथे संधींची उपलब्धता मर्यादित होती. वासू भगनानी यांनी स्पष्ट केलं की, "कोलकातामध्ये आम्ही चार भाऊ होतो, तिथे संधींची कमतरता असल्यानं, आम्ही असा निर्णय घेतला की, आमच्यापैकी एकानं दिल्लीला जावं..."
वासु भगनानी यांनी सांगितलं की, हे स्थलांतर त्यांच्या आयुष्यातला एक अत्यंत निर्णायक वळण ठरला. ते म्हणाले की, "दिल्लीत दाखल होताच, मी 'प्रीत विहार'मध्ये एक छोटा प्लॉट खरेदी केला. त्याचप्रमाणे, मी 'आनंद विहार' आणि अशाच इतर परिसरांमध्येही काही प्लॉट खरेदी केले. त्यानंतर मी त्या प्लॉट्सवर आलिशान बंगले (व्हिला) उभारले आणि ते विकले. त्यानंतर, 'शंकर विहार'मध्ये 'VIP बिल्डिंग' नावानं ओळखली जाणारी एक इमारत उभी राहिली, मी स्वतः उभं राहून त्याचं बांधकाम पूर्ण करुन घेतलेलं. आणि अवघ्या चार महिन्यांतच तो संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेला. तिथूनच बांधकाम क्षेत्रात माझ्या कारकिर्दीची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. कारण कोलकातामध्ये असताना, आमचा कौटुंबिक व्यवसाय साड्यांचा होता, बांधकामाचा नव्हे..."

मुंबईत नशीब पालटलं अन् आयुष्या खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली (Vashu Bhagnani Produce Films)
पण मुंबईच ते शहर होतं, ज्यानं वासुचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकलं. त्यानं सांगितलं की, "मग, या सर्व घडामोडींच्या दरम्यान, होळीच्या सुमारास मी मुंबईत आलो आणि त्यानंतर दिल्लीकडे मी कधीच वळून पाहिलं नाही..." मुंबईत आल्यावर नशीब कसं पालटलं, याविषयी बोलताना ते म्हणाले की, "हा सर्व नशिबाचा खेळ आहे, मला कधीच कल्पना नव्हती की, अखेर मी बॉम्बेला (मुंबईला) स्थायिक होईन. होळीच्या काळात जेव्हा मी मुंबईत दाखल झालो, तेव्हा आम्ही 'ओरिएंटल पॅलेस' नावाच्या एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर मी अगदी तिथेच स्थायिक झालो, जमिनीचा एक भूखंड विकत घेतला आणि बांधकामाचं काम सुरू केलं. एकदा का तिथे कामाला सुरुवात झाली, की अवघ्या तीन ते चार वर्षांच्या कालावधीतच मी 12 ते 15 इमारती उभारल्या..."
त्यानंतर ऑडियो कॅसेट बनवण्याचं काम सुरू केलं आणि त्यानंतर फिल्मी जगतात पाऊल ठेवलं. निर्मात्यानं सांगितलं की, आयुष्यानं खरं वळण तेव्हा घेतलं, जेव्हा त्यांनी गोविंदाचा 'आंखे' सिनेमा पाहिला. त्यानं ठरवलेलं की, गोविंदाला मी साईन करणार. पुढच्याच दिवशी त्यांनी अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन दोघांनाही साईन केलं. त्यानंतर दोघांसोबत मिळून त्यांनी कित्येक सुपरहिट फिल्म्स केल्या. गेल्या काही वर्षांत, भगनानी यांनी विविध प्रकारच्या सिनेमांची निर्मिती केली. 1990 च्या दशकातील 'नंबर 1' मालिकांमधील गाजलेल्या विनोदी सिनेमांपासून ते 'मिशन राणीगंज', 'गणपत' (Ganapath) आणि 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) यांसारख्या अलीकडेच आलेल्या सिनेमांपर्यंत, अनेक सिनेमांची निर्मिती वासु भगनानी यांनी केली.

'ओम जय जगदीश' ठरला आर्थिक बर्बादीचं कारण
'ओम जय जगदीश' (2002) या सिनेमानं वासु भगनानी यांना मोठा आर्थिक धक्का दिला. हा सिनेमा अनुपम खेर यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता आणि यात अनिल कपूर, अभिषेक बच्चन, फरदीन खान यांसारख्या नामवंत कलाकारांचा समावेश होता. वासु भगनानी यांचा मुलगा अभिनेता जॅकी भगनानी यानं एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, 'ओम जय जगदीश' सुपरफ्लॉप ठरल्यामुळे त्यावेळी कुटुंबाच्या एकूण कमाईचा एक मोठा हिस्सा नष्ट झालेला. असं असूनही, भगनानी यांनी सिनेसृष्टी आणि विविध व्यावसायिक उपक्रमांच्या माध्यमातून, विशेषतः बांधकाम क्षेत्रातून आपलं आर्थिक साम्राज्य पुन्हा उभं केलं. बांधकाम क्षेत्राचा त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर, अगदी युनायटेड किंगडमपर्यंत (UK) यशस्वीपणे विस्तार केला. आज, वासु भगनानी यांची एकूण संपत्ती (Net Worth) अंदाजे 2,500 कोटी असल्याचं सांगितलं जातं.
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

