Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सव...अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.. हा सण भगवान श्री गणेशाच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि मंगलमय वातावरणाचा उत्सव आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ गणपतीची पूजा नव्हे, तर भक्ती, संस्कृती, कुटुंब, सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पंचांगानुसार यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होतोय, तसेच यंदा हा सण 10 दिवसांचा नसून तब्बल 12 दिवसांचा असणार आहे. गणेशोत्सवात घरोघरी बाप्पाचे आगमन होणार असल्याने बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अनेकवेळेस गुरूजी उपलब्ध नसतात. अशा वेळी काय करावे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. तर बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजी उपलब्ध नसल्यास, आपण स्वतः अत्यंत श्रद्धेने आणि शुद्ध मनाने खालील सोप्या शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पाची पूजा करू शकता. कारण देव भक्तीचा भुकेला असतो, त्यामुळे प्रत्येक विधी मनापासून करणे महत्त्वाचे आहे. पूजा विधीचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत..
गणेश चतुर्थीची पूजा, स्थापनेचा शुभ मुहूर्त....
पंचांगानुसार गणेश चतुर्थीची चतुर्थी तिथी 14 सप्टेंबरच्या सकाळी सुरू होते आणि गणेशपूजेसाठी दुपारच्या सुमारास मुहूर्त आहे.
गणेश चतुर्थीची पूजा/स्थापना मुहूर्त - पंचांग गणनेनुसार, सकाळी 11:16 ते 1:44 दुपारी असा आहे.
भगवान गणेशाचा जन्म मध्यान्ह काळात म्हणजेच दुपारच्या वेळी झाला होता,
म्हणूनच गणेश मूर्तीची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा पूजा मध्यान्ह काळात करणे अत्यंत फलदायी आणि सर्वोत्तम मानले जाते.
या शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी 2 तास 28 मिनिटे आहे.
पूर्वतयारी आणि शुद्धीकरण (Ganesh Chaturthi 2026)
- पूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ, पारंपारिक कपडे (उदा. धोतर, कुर्ता किंवा सोवळे) परिधान करावेत.
- पूजा करणाऱ्या व्यक्तीने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.
- उजव्या हातात थोडे पाणी घेऊन ते स्वतःवर आणि पूजा साहित्यावर शिंपडावे आणि पुढील मंत्राचा उच्चार करून शुद्धीकरण करावे:
"ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा।
यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः॥"
आसनाची आणि कलशाची मांडणी
- लाकडी चौरंग किंवा पाटावर स्वच्छ लाल कापड अंथरून घ्या.
- पाटाच्या मध्यभागी तांदळाची रास पसरवून ठेवा.
- त्यावर बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे.
- पाटाच्या उजव्या बाजूला तांदळाची एक लहान रास करून त्यावर पाणी भरलेला कलश ठेवावा.
- कलशामध्ये एक नाणे, सुपारी आणि अक्षता टाकाव्यात.
- कलशाच्या तोंडावर आंब्याची 5 पाने गोलाकार रचून त्यावर मध्यभागी नारळ ठेवावा.
- कलशाला हळद-कुंकू लावून त्याची पूजा करावी.
बाप्पाचे आसन ग्रहण-प्रतिष्ठापना
- दुकानातून आणलेली बाप्पाची मूर्ती यात्रेच्या वस्त्रावर किंवा तांदळाच्या राशीवर ठेवावी.
- मूर्तीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
- त्यानंतर मूर्तीच्या हृदयाला किंवा मूर्तीला उजव्या हाताने स्पर्श करून मनात बाप्पाचे ध्यान करावे आणि म्हणावे..
- "हे देवा, तू या मूर्तीमध्ये वास कर आणि माझ्या पूजेचा स्वीकार कर."
- या विधीला 'प्राणप्रतिष्ठा' असे म्हणतात.
स्नान आणि अभिषेक विधी
- घरातील मातीची किंवा शाडूची मूर्ती असल्यास त्यावर थेट पाणी किंवा पंचामृत ओतू नये,
- कारण यामुळे मूर्ती विरघळू शकते किंवा तिचा रंग खराब होऊ शकतो.
- अशा वेळी एका लहान पळीमध्ये पाणी आणि पंचामृत घेऊन त्यात दुर्वा किंवा फूल बुडवून ते मूर्तीवर हलकेच प्रोक्षण करावे (शिंपडावे).
- ही केवळ मानसिक स्नानाची प्रक्रिया आहे.
- जर मूर्ती धातूची किंवा पाषाणाची असेल तर त्यावर थेट अभिषेक करू शकतो.
- स्नान झाल्यावर मूर्ती स्वच्छ, मऊ कापडाने हळुवार पुसून घ्यावी.
हळद-कुंकू, गंध आणि वस्त्र अर्पण
- बाप्पाच्या कपाळावर आणि चरणावर शेंदूर किंवा अष्टगंधाचा टिळा लावावा.
- हळद आणि कुंकू अर्पण करावे.
- कापसाची गेज किंवा लाल वस्त्र बाप्पाच्या गळ्यात घालावे.
- डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला जानवे (यज्ञोपवीत) अर्पण करावे.
- मूर्तीला थोडे सुगंधी अत्तर लावावे.
वनस्पती, पत्री, दुर्वा वाहणे
- बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत.
- 21 दुर्वांची जुडी एकत्र करून ती बाप्पाच्या चरणावर किंवा डोक्यावर अर्पण करावी.
- सोंडेवरदेखील दुर्वा वाहिल्या जातात.
- लाल रंगाचे जास्वंदाचे फूल बाप्पाला वाहावे.
- तसेच शमीची पाने अर्पण करावीत.
धूप, दीप आणि नैवेद्य
- अगरबत्ती आणि धूप पेटवून मूर्तीला ओवाळावी.
- समई लावून दिव्याची पूजा करावी.
- त्यानंतर बाप्पाला 21 उकडीच्या मोदकांचा आणि फळांचा नैवेद्य दाखवावा.
- नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटाभोवती उजव्या हाताने पाणी फिरवून पुढील मंत्र म्हणावा:
- "ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा,
- ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रह्मणे स्वाहा."
आरती आणि मंत्रपुष्पांजली
- घरातील सर्वांनी एकत्र येऊन अत्यंत आनंदाने बाप्पाच्या आरत्या कराव्यात.
- प्रथम 'सुखकर्ता दुःखहर्ता' ही समर्थ रामदास स्वामींनी रचलेली आरती म्हणावी.
- त्यानंतर 'शेंदूर लाल चढायो' आणि शेवटी 'घालीन लोटांगण' म्हणावे.
- कापूर पेटवून आरती ओवाळावी.
- आरती झाल्यावर डोक्यावर अक्षता आणि फुले घेऊन मंत्रपुष्पांजली: "ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि..."
- म्हणत ती फुले बाप्पाच्या चरणी अर्पण करावीत.
- शेवटी सर्वांनी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन पूजा संपन्न करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

