कोल्हापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी (Gokul Election) महायुतीचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली.
त्यानुसार सर्वाधिक जागा या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहेत. तर शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला समसमान जागा येतील. येत्या 11 ऑक्टोबर रोजी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 19 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे. 25 जागांसाठी जवळपास 207 अर्ज दाखल झालेले असून गुरुवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. गोकुळमध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाची महायुती असून हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी आहे.
Gokul Election : गोकुळसाठी महायुतीचा फॉर्म्युला कसा?
एकूण जागा - 25
- राष्ट्रवादी काँग्रेस - 9
- भाजप - 7
- शिवसेना - 7
- जनसुराज्य - 2
Gokul Election Voting Timetable : निवडणुकीचे वेळापत्रक
- अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप - 9 ऑक्टोबर
- मतदान - 18 ऑक्टोबर
- मतमोजणी व निकाल - 19 ऑक्टोबर
Gokul Election Politics : जागावाटपावरून नाराजी?
गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात येणार असल्याची माहिती या आधी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. परंतु जागावाटपावरून घोडं अडलं होतं. सर्वाधिक ठराव असलेल्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे 10 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती होती. परंतु, भाजपकडून त्यांना तेवढ्या जागा देण्यास असमर्थता दर्शवण्यात आल्याने ते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. मात्र गोकुळची निवडणूक ही हसन मुश्रीफांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यानुसार आता जागावाटपही जाहीर झालं आहे. 10 जागांसाठी आग्रही असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या वाटेला 9 जागा आल्या आहेत.
Gokul Satej Patil Vs Mahayuti : बिनविरोधाची आशा मावळली?
दरम्यान, गोकुळची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी पडद्याआडून प्रयत्न केले गेले. त्यासाठी सतेज पाटील गटाला 4 जागा सोडण्यात येतील, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.
कोणत्याही परिस्थितीत गोकुळची निवडणूक होणारच, असं सतेज पाटील म्हणाले. सतेज पाटील यांच्या पॅनेलचे 25 उमेदवार जाहीर होणार असून हे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Author : विजय केसरकर, एबीपी माझा

