Dailyhunt
Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार

Gokul Election: 'गोकुळ'वर प्रशासक अटळ! विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूकही लांबणीवर जाणार

ABP माझा 2 weeks ago

Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीवरून रणकंदन सुरु असताना आज (30 एप्रिल) विद्यमान संचालक मंडळाला तगडा झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे गोकुळवर प्रशासकराज अटळ आहे. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत चार मे रोजी संपत आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाला मुदतवाढ न मिळाल्याने गोकुळवर प्रशासकराज जवळपास निश्चित झालं आहे. प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान चार महिन्याने पुढे जाण्याची शक्यता आहे. सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती. दरम्यान, गोकुळ दूध संघाने न्यायालयाची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला.

निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्याचे संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 28 एप्रिल रोजी संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत महायुतीमधील सर्व नेतेमंडळींची तास ते दीड तासभर बैठक झाली. मुंबईत त्यांच्या वर्षा या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

दरम्यान, या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, ही निवडणूक मी ताबडतोब लावतो. विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत, त्याबाबतची माहितीही त्यानी दिली. त्यावर काय उपाय शोधता येतील, याबाबतही बैठकीत अनेक नेत्यांनी आपापली मते सुचविली. कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्हीही मुद्द्यांवर तोडगा काढतो आणि महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवा, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हा सर्व नेतेमंडळींना दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : विजय केसरकर, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha