Hariyanvi Singer Ankit Baliyan KIlled: हरियाणवी गायक आणि अभिनेता अंकित बालियान (Ankit Baliyan) याची उत्तर प्रदेशातील शामली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूच्या अवघ्या दोन तास आधी अंकितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
या व्हिडिओमध्ये तो 'मर्डर मार दे सडक के ऊपर...' गाणं गाताना दिसतोय. मृत्युच्या अवघ्या दोन तास आधी त्याने हा व्हिडिओ शेअर केलेला.मात्र, काही वेळातच त्याच्या हत्येची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Crime News)
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथे बुधवारी संध्याकाळी हरियाणवी गायक आणि अभिनेता अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शामली कोतवाली परिसरात घडली. अंकित संध्याकाळी जिममध्ये गेला होता. जिममधून बाहेर पडताच काही हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक गोळ्या लागल्याने अंकित गंभीर जखमी झाला आणि जागीच कोसळला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.
जिल्हा पंचायत निवडणुकीचीही करत होता तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, अंकित बालियान सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीतही होता. अशातच त्याच्या अचानक हत्येच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, अंकितची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली असून परिसरातील नागरिकांचीही चौकशी केली जात आहे. घटनास्थळी आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचं फुटेजही तपासलं जात आहे. या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. घटनेपूर्वी अंकित कुठेकुठे गेला होता, त्याच्या हालचाली काय होत्या आणि हल्लेखोर घटनास्थळी कसे पोहोचले, याचाही तपास केला जात आहे.
शेवटी पोस्ट पाहून सगळेच हादरले..
मृत्युच्या दोन तास आधी अंकितने एक पोस्ट केलेली. व्हिडिओमध्ये अंकित हरियाणवी अंदाजात गाणं गाताना म्हणत होता, 'रे खास भाई कि भड़क के ऊपर, मर्डर मार दे सड़क के ऊपर...' त्यानंतर त्याने चाहत्यांना ही ओळ आपल्या भावांसाठी लिहिल्याचं सांगत व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन केलं. व्हिडिओच्या शेवटी तो 'जय रामजी की भाइयों... जय बप्पा की, जय भारत' असं म्हणताना दिसतोय.अंकितच्या याच पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये आता चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येऊ लागल्या आहेत. काहींना अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाहीये. काही तासांपूर्वीच ज्या व्हिडिओमध्ये अंकित हसत-गाताना दिसत होता, त्यानंतर अचानक त्याच्यासोबत इतकी मोठी दुर्घटना घडल्याने चाहतेही हादरले आहेत.
कोण होता अंकित बालियान?
अंकित बालियान हे हरियाणवी संगीत आणि सोशल मीडियाच्या जगतातील एक परिचित नाव होतं. तो युट्यूबर आणि हरियाणवी अभिनेता म्हणूनही सक्रिय होता. 'भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान' या गाण्यामुळे त्याला विशेष ओळख मिळाली होती. 2023 मध्ये शामली येथे झालेल्या त्याच्या रोड शोचीही मोठी चर्चा झाली होती. अंकित हा शामलीतील बंतीखेडा गावचा रहिवासी असल्याचं सांगितलं जातं. सोशल मीडियावर त्याची मोठी फॅन फॉलोइंग होती आणि तो आपल्या गाण्यांमधून व व्हिडिओंच्या माध्यमातून चाहत्यांशी सतत जोडलेला होता.
Author : abp majha web team

