Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Health Tips : मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी अॅप्सचा वापर करताय? अॅप्सवर सर्वस्वी अवलंबून राहण्यामुळे वाढू शकते चिंता

Health Tips : मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी अॅप्सचा वापर करताय? अॅप्सवर सर्वस्वी अवलंबून राहण्यामुळे वाढू शकते चिंता

ABP माझा 1 week ago

Health Tips : मासिक पाळीच्या बदलत्या तारखा, मासिक पाळीची लक्षणं, ओव्ह्युलेशन आणि गर्भधारणेसाठी योग्य दिवस समजून घेण्यासाठी अनेक महिला मोबाईल अॅप्सचा वापर करतात. काहींसाठी ही अॅप्स शरीरातील बदल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरत असली, तरी अॅपने दाखवलेल्या प्रत्येक तारखेवर आणि अंदाजावर अवलंबून राहिल्याने मानसिकरित्या चिंता वाढू शकते.

मासिक पाळीचा प्रत्येक चक्र एकसारखा नसतो, त्यामुळे अॅपचा अंदाज हा मार्गदर्शक असू शकतो.

डॉ. बुशरा खान, फर्टिलिटी एक्सपर्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे यांनी सांगितले की, आज अनेक महिला मासिक पाळी, अंडोत्सर्जन, ओव्ह्युलेशन डे, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, मनःस्थिती आणि इतर लक्षणांची नोंद ठेवण्यासाठी या अॅप्सचा वापर करतात. दीर्घकाळ नोंदी ठेवल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रातील बदल आणि ठराविक लक्षणांचे स्वरूप समजण्यास मदत होऊ शकते. गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना अॅपच्या माध्यमातून फलनक्षम कालावधीचा अंदाजही मिळू शकतो.

अॅप्समुळे शरीरातील बदल समजण्यास मदत

मासिक पाळी नियमितपणे नोंदवल्यामुळे मासिक पाळीचे चक्र किती दिवसांचे आहे, ते नियमित आहे का, पाळी चुकते आहे का किंवा नेहमीपेक्षा जास्त अथवा कमी दिवसांची होत आहे का, याची माहिती मिळू शकते. वारंवार जाणवणाऱ्या वेदना किंवा इतर लक्षणांची नोंदही ठेवता येते. डॉक्टरांशी प्रजनन आरोग्याबाबत चर्चा करताना ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

ओव्ह्युलेशन डे चा मिळतो अंदाज

अनेक अॅप्स मागील मासिक पाळीच्या नोंदी आणि मासिक पाळीच्या कालावधीवर आधारित अंडोत्सर्जनाचा काळ ठरवला जातो. गर्भधारणेची शक्यता अधिक असलेल्या दिवसांचा साधारण अंदाज मिळू शकतो. मात्र, यामुळे तणाव, आजारपण, संप्रेरकांमधील बदल आणि अनियमित मासिक पाळी अशा असे अनेक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन कालावधी देखील दर महिन्याला बदलू शकतो.

ॲप्सने वर्तविलेला अंदाज म्हणजे वैद्यकीय निदान नाही

अॅपच्या माध्यमातून अंडोत्सर्जन प्रत्यक्षात झाले आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. विशेषतः अनियमित मासिक पाळी, पीसीओएस, थायरॉईडचे विकार किंवा इतर संप्रेरकांशी संबंधित समस्या असलेल्या महिलांमध्ये अॅपचे अंदाज मर्यादित ठरू शकतात. त्यामुळे अॅपवर दिसणाऱ्या तारखा या केवळ अंदाज म्हणून पाहाव्यात; त्यांना वैद्यकीय निदान किंवा गर्भधारणेची हमी समजू नये.

सतत ट्रॅकिंगमुळे वाढू शकते चिंता

मासिक पाळीची तारीख, लक्षणं ओव्ह्युलेशनचा अंदाज किंवा प्रजननासंबंधित माहिती तपासत राहिल्याने काही महिलांमध्ये चिंता वाढू शकते. गर्भधारणेचा प्रयत्न करताना अॅपने दर्शवलेला एखादा ओव्ह्युलेशन दिवस चुकला, तर अनावश्यक काळजी निर्माण होऊ शकते. प्रत्यक्षात गर्भधारणा केवळ एका विशिष्ट दिवसावर अवलंबून नसते.

माहितीचा उपयोग करा, दबाव निर्माण करू नका

मासिक पाळीचे ट्रॅकिंग करण्यामागचा उद्देश शरीरातील बदल समजून घेणे हा असावा त्याचे अनावश्यक ताण घेणे टाळा. प्रत्येक मासिक पाळी, लक्षण किंवा ओव्ह्युलेशनचा अंदाज अगदी अचूक असलाच पाहिजे, असा दबाव महिलांनी घेऊ नये. अॅप वापरल्यामुळे ताण वाढत असल्यास त्याचा वापर काही काळ थांबवणे किंवा ते वारंवार तपासण्याची सवय कमी करणे फायदेशीर ठरू शकते.

कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला?

मासिक पाळी वारंवार अनियमित होणे, तीव्र वेदना होणे, खूप जास्त रक्तस्राव होणे, कारण न समजता पाळी चुकणे किंवा गर्भधारणेस अडचण येणे अशा परिस्थितीत केवळ अॅपवर अवलंबून न राहता स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मासिक पाळीचे अॅप्स प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी उपयुक्त साधन ठरू शकतात. मात्र, त्यातून मिळणारे अंदाज अंतिम किंवा अचूक मानता येत नाहीत. वय, संप्रेरके, एकूण आरोग्य आणि इतर अनेक घटकांचा प्रजननक्षमतेवर परिणाम होत असतो, ज्याचे पूर्ण मूल्यमापन हे अॅप करू शकत नाही हे लक्षात असू द्या. त्यामुळे मासिक पाळीचे ट्रॅकिंग चिंतेचे कारण न बनवता शरीराचे चक्र समजून घेण्याचे साधन म्हणून वापरणे अधिक योग्य ठरेल.

- डॉ. बुशरा खान, फर्टिलिटी एक्सपर्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे

Health: कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे कधी थांबवावे? 'ही' धोक्याची लक्षणं, दुर्लक्ष करू नयेत, नेत्रतज्ज्ञ सांगतात...

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha