Team India Squad Against Afghanistan T20 Series: अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात जसप्रीत बुमराहचाही समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराहने एकही सामना खेळलेला नाही. मात्र, फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याला खेळता येणार आहे.
संजू सॅमसनचे संघात पुनरागमन- (Sanju Samson Ind vs AFG)
झिम्बाब्वे दौऱ्यात टी-20 संघातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनचे संघात पुनरागमन झाले आहे. टी-20 विश्वचषकातील भारताच्या विजयानंतर संजू चर्चेत आला होता. मात्र, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले होते. त्याच्या जागी इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-11 मध्ये संधी देण्यात आली होती. मात्र, तिथे त्यालाही विशेष कामगिरी करता आली नाही. अखेरच्या सामन्यात संजूला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी करत प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी वैभवलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
चार खेळाडूंची फिटनेस टेस्ट बाकी- (Jasprit Bumrah Harshit Rana)
अफगाणिस्तान मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील चार खेळाडूंची फिटनेस टेस्ट बाकी आहे. यामध्ये नीतीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी या खेळाडूंना फिटनेस टेस्ट उत्तीर्ण करावी लागेल. त्यानंतरच त्यांच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल. हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी हेही दीर्घकाळापासून दुखापतीमुळे संघाबाहेर होते. दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदरलाही श्रीलंका दौऱ्यावर जाता आले नव्हते.
रिंकूसह 8 खेळाडू संघाबाहेर- (Rinku Singh Ind vs AFG)
झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय टी-20 संघाचा भाग असलेल्या रिंकू सिंहसह आठ खेळाडूंना अफगाणिस्तान मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. यामध्ये प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रभसिमरन सिंह आणि हर्ष दुबे यांचा समावेश आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात यश ठाकूर आणि अशोक शर्मा यांनी भारतासाठी पदार्पण केले होते. तर प्रिन्स यादव झिम्बाब्वे दौऱ्यात दुखापतग्रस्त झाला होता.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ- (Team India Squad Against Afghanistan T20 Series)
- श्रेयस अय्यर - कर्णधार
- अभिषेक शर्मा
- वैभव सूर्यवंशी
- संजू सॅमसन - यष्टिरक्षक
- ईशान किशन - यष्टिरक्षक
- तिलक वर्मा - उपकर्णधार
- शिवम दुबे
- नीतीश कुमार रेड्डी
- अक्षर पटेल
- वॉशिंग्टन सुंदर
- वरुण चक्रवर्ती
- रवी बिश्नोई
- जसप्रीत बुमराह
- अर्शदीप सिंह
- हर्षित राणा
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

