जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दसेगाव फाट्याजवळ भीषण अपघात घडला.
वाळूने भरलेल्या एका भरधाव डंपरने स्कुटीवर जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना चिरडले.
डंपरचा वेग प्रचंड असल्याने विद्यार्थिनींना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
या भीषण धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी विद्यार्थिनी गंभीररीत्या जखमी झाली आहे.
अपघातानंतर गंभीर जखमी असलेल्या विद्यार्थिनीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची बातमी समजताच दसेगाव आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने महामार्गावर जमा झाले. त्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन सुरू केले.
संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघातानंतर वाळूने भरलेले वाहन घटनास्थळावरून तातडीने का हलवण्यात आले? असा सवाल नागरिकांनी विचारला.
पोलिसांनी या अपघाताचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप आंदोलक ग्रामस्थांनी केला आहे.
आंदोलनस्थळी परिस्थिती तणावपूर्ण होताच उपस्थित पोलिसांनी तेथून पळ काढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनस्थळी परिस्थिती तणावपूर्ण होताच उपस्थित पोलिसांनी तेथून पळ काढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर ग्रामस्थ आक्रमक झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
संबंधित डंपर चालक आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

