नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत विरोधकांचे आंदोलन तापलेले असतानाच दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) निदर्शनांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक नियमावली जारी केली आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे आंदोलन किंवा निदर्शने करण्यासाठी आता 10 दिवस आधी दिल्ली पोलिसांकडे रीतसर परवानगी मागणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, जंतर-मंतरवर एकाच वेळी फक्त 1,000 आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
Delhi Police Guidelines : 'या' नियमांचे पालन करणे बंधनकारक
सुप्रीम कोर्टाच्या 2018 मधील आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी ही नियमावली लागू केली आहे. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नव्या नियमांनुसार:
10 दिवसांपूर्वी अर्ज अनिवार्य: प्रस्तावित आंदोलनाच्या किमान 10 दिवस आधी नवी दिल्लीच्या पोलीस उपायुक्त (DCP) कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.
आंदोलकांची संख्या मर्यादा: जंतर-मंतरवर कमाल 1,000 लोकच एकत्र येऊ शकतात.
मोठ्या आंदोलनांसाठी नवीन जागा: 1,000 ते 50,000 आंदोलकांसाठी 'रामलीला मैदान' (Ramlila Maidan) आणि 50,000 पेक्षा जास्त गर्दी असल्यास 'बुरारी' (Burari) येथील मैदान निश्चित करण्यात आले आहे.
Central Vista Protest Ban : सेंट्रल व्हिस्टा परिसरात आंदोलनास सक्त मनाई
दिल्ली पोलिसांनी सेंट्रल व्हिस्टा परिसरातील ठिकाणांवर कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांना पूर्णपणे बंदी घातली आहे.
इंडिया गेट, सी-हेक्सागॉन, मानसिंग रोड, जनपथ, राजपथ आणि त्याभोवतीच्या लॉन परिसरात निदर्शने करण्यास कडक मनाई करण्यात आली आहे.
CJP Protest 10 October : 10 ऑक्टोबरच्या आंदोलनावरून वाद होण्याची शक्यता
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) 10 ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून, याबाबत सीजेपीचे सह-संयोजक सौरव दास यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात लेखी सूचना दिली आहे.
या आंदोलनात हजारो लोक सहभागी होणार असल्याचा दावा सीजेपीने केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांच्या नव्या नियमांनुसार 10 दिवसांची पूर्वपरवानगी आणि 1,000 लोकांची मर्यादा यामुळे 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलीस परवानगी देतात की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सलग दोन दिवस आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीला संपवल्याचा आरोप करत त्यांना राजीनामा द्यावाचल लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
Author : एबीपी माझा ब्युरो

