Ramayan: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)त्याच्या रामायणातील प्रभू रामचंद्राच्या लुकमुळे प्रचंड चर्चेत आहे. तब्बल 4000 कोटी रुपयांचं बजेट असणारा हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाचे दोन भाग आहेत. या चित्रपटाचा अलीकडेच प्रदर्शित झालेला टिझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. एकीकडे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या प्रभू रामाच्या लुकचं कौतुक होताना दिसतंय तर दुसरीकडे ॲनिमलसारख्या चित्रपटात Toxic आणि खूनशी भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरला रामायण सिनेमात प्रभू रामचंद्राची भूमिका दिल्याने अनेक जण त्याला ट्रोल करतानाही दिसतायत. दरम्यान, 'स्वराज्यरक्षक संभाजी ' फेम अभिनेते स्वप्निल राजशेखरने (Swapnil Rajasekhar) रणबीरला ट्रोल करणाऱ्यांवर थेट पोस्ट केलीय. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. (Ramayan Ranbir Kapoor controversy)
काय म्हणाले स्वप्निल राजशेखर ?
स्वप्निल म्हणाले ' रामायण' या आगामी चित्रपटात 'ॲनिमल' मधली खुनशी, नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रभु श्रीराम यांची भुमिका दिल्याबद्दल आक्षेप व्यक्त होतोय…तर तर, छ. शिवरायांची भुमिका करणाऱ्या अभिनेत्यांपैकी सर्वात उत्तम मानले जातात ज्येष्ठ अभिनेते स्व. चंद्रकांत मांडरे. (सध्या ते सोशल मिडीयावरसुध्दा चर्चेत आहेत, माहिती असेल.) त्याकाळी रजतपटावर सर्वात लोकप्रिय श्रीराम साकारणाऱ्या चंद्रकांत यानी एका सिनेमात ('स्वयंवर झाले सीतेचे'मधे) रावणही केलाय.. 'रम्य ही स्वर्गाहुन लंका' गाणं युट्युबवर पहा… शिवाय खूप आधी 1940च्या दशकात 'जय मल्हार' या सिनेमात एक अत्यंत उन्मत्त, स्त्रीलंपट, आणि नायिकेचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला आपल्या वाड्यावर कोंडुन ठेवणारा कडवट खलनायक अस्सल आणि उत्तम साकारलाय चंद्रकांतनी…सिनेमा गोल्डन ज्युबिली होता. (यातलाच तो उन्मादी खलनायक भविष्यात राजशेखर यानी पुढे नेला.
"तस्मात ॲनिमलमधे खलनायकी भुमिका करणारा अभिनेता श्रीराम साकारुच शकतो. बाकी तो ती भूमिका कशी निभावेल ते सिनेमा पाहुन बोलुया…आत्ताच कशाला?!!! प्रेक्षक कौल देतीलच". असं त्यांनी म्हटलं. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं मत मांडलं आहे. अनेकांनी या पोस्टचं कौतुक केल्याचं दिसतय. अनेकांना हा मुद्दा पटलाय.
Author : जयदीप मेढे

