Kalyan Honour Killing Case : कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणाऱ्या एका विवाहित तरुणीला अत्यंत निर्घृणपणे संपवून फरार झालेल्या नराधम वडिलाला बाजारपेठ पोलिसांनी अखेर अटक केली.
या खळबळजनक अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या हत्येमागील जे कारण समोर आलं आहे, त्याने संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला आहे. केवळ मुलीने आपल्या मनाविरुद्ध आणि कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच तिचं आयुष्य संपवल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.
Kalyan Crime Investigation : दोन वेळा साखरपुडा मोडला, नंतर केला विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलाचे नाव असून, गायत्री असं मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे. तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, गायत्रीने कुटुंबाच्या पसंतीला नाकारून इतर जातीतील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता.
वडिलांनी गायत्रीसाठी आधी दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी साखरपुड्याची (Engagement) मोठी तयारी केली होती, मात्र गायत्रीने ते दोन्ही स्थळं नाकारले होते. त्यानंतर तिने स्वतःच्या पसंतीने इतर जातीत लग्न उरकले. याच गोष्टीचा प्रचंड राग आणि सुडाची भावना विनोद वसईकर याच्या मनात कायम धुमसत होती.
Kalyan Murder Incident : जेवणानंतर वाद विकोपाला आणि घात झाला
लग्नानंतर काही दिवसांनी गायत्री काही कामासाठी आपल्या माहेरी रचना रॉयल इमारतीमधील घरी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील विनोद वसईकर आणि मुलगी गायत्री यांच्यात विवाहाच्या जुन्या विषयावरून पुन्हा एकदा तीव्र वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोदने घरात असलेले धारदार शस्त्र काढून गायत्रीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गायत्री रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
Bazar Peth Police Action : तांत्रिक तपासाच्या आधारे अटक
आपल्याच सख्ख्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी विनोद वसईकर अत्यंत चलाखीने घटनास्थळावरून पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे (Bazar Peth Police Station) वरिष्ठ अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली. अखेर तीन दिवसांनंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत विनोद वसईकर याला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या कडक चौकशीदरम्यान त्याने मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातूनच तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
Author : सुरेश काटे

