Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून 22 वर्षीय युवकानं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर गावात घडली आहे.
केशव बाबुराव वनारे असं या तरुणाचं नाव असूनस त्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं आहे.
दहा दिवसात बुलढाणा जिल्ह्यात लग्न न जुळल्याने ही तिसरी आत्महत्या
माकनेर गावातील केशव बाबुराव वनारे या 22 वर्षीय युवकांनी लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. केशव हा उच्चशिक्षित होता व अनेक दिवसांपासून लग्नासाठी प्रयत्न करत होता. मात्र लग्न जुळत नव्हतं व घरी शेती नसल्याने कुणी मुलगी ही देत नव्हतं. यामुळे नैराश्यातून केशवने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस तपास करत आहे. अलीकडे बुलढाणा जिल्ह्यात लग्न जुळत नसल्याच्या कारणावरून तरुणांमध्ये वाढत चाललेले नैराश्य व व्यसनाधीनता हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या दहा दिवसात बुलढाणा जिल्ह्यात लग्न न जुळल्याने ही तिसरी आत्महत्या आहे.
लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
लोणावळ्यातील वलवण धरणात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला आहे. काल दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कुरवंडे गाव येथील योगेश पालवे हा तरुण वलवण डॅम येथे पाण्यात पोहण्यास उतरला असता, पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काल रात्री लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आज लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी स्कूबा किटच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले, तर बाहेर शोध पथकाने दोरीच्या साहाय्याने मदत केली. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या शोधमोहीमेनंतर अखेर मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह पाण्याबाहेर काढून पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोणावळा शहर पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आला.
Author : डॉ. संजय महाजन

