Thane Crime News :महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात 'लिपीक टंकलेखक' पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणाची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी तीन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-2 (भिवंडी) पथकाने गजाआड केले आहे. आरोपींकडून मंत्रालयातील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचे बनावट सही-शिक्के, लेटरहेड आणि बनावट नियुक्तीपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे उघड
भिवंडीतील काल्हेर गावचे रहिवासी तक्रारदार दर्शन संतोष पाटील (वय 28) यांना आरोपी शाम विठोबा खतकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट सही-शिक्के असलेली पत्रे दाखवून विश्वासात घेतले. आरोपींनी पाटील यांच्याकडून 70 लाख रुपये ऑनलाईन व रोखीने उकळून त्यांना लिपीक पदाचे बनावट नियुक्तीपत्र व ओळखपत्र दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भिवंडी गुन्हे शाखेने तपास चक्र फिरवून पुढील कारवाई करीत आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. मुख्य आरोपी शाम खतकर याच्यावर मुंबईतील एमएचबी, काशिमीरा, कोपरी, दादर, कफ परेड अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर जुगल लोडाया आणि रविंद्र शंखुआ यांच्यावरही वर्तकनगर आणि हिंगोली येथे अशाच प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. सदर कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत व त्यांच्या पथकाने केली.
बारामती शहर पोलीस ठाण्यात एका महिला वकिलाच्या तक्रारीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश मोहन जाधव असं या पोलीस हवालदाराचं नाव असून त्यानं लग्नाचे खोटे आश्वासन देत विश्वास संपादन केला. दीर्घकाळ सहजीवन ठेवून लैंगिक शोषण केले.आर्थिक फसवणूक करत धमक्या दिल्या आणि या महिला वकिलाच्या मुलीचा स्वीकार करण्यास नकार देखील दिला असे गंभीर आरोप या पीडित महिला वकिलाने केले आहेत. त्यावरून रमेश जाधव यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
Author : हितेश पांचाळ

