मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांपासून पावसाने रौद्ररूप धारण केलं असून राज्यभर पावसाचं जोरदार धुमशान सुरू आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांना तलावाचे स्वरूप आले असून जनजीवनही विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. पुढील दोन दिवस, म्हणजे 6 जुलै पर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडावं अशा सूचना हवामान खात्याने (Maharashtra Weather Update) दिल्या आहेत.
सतत कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. शहरात कुठे रस्ते खचले, तर कुठे झाडे कोसळण्याच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातही पंचगंगेच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.
Mumbai Waterlogging Update : मुंबईत जनजीवन विस्कळीत
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात रोल्टा जंक्शन जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. तर सीप्झच्या दोन नंबरच्या (Seepz 2) गेटसमोर पाणी साचल्याने एमआयडीसी ते जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडला जाणारी वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Thane Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीचे रस्ते जलमय
मुसळधार पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाल्याचं दिसून आलं. स्टेशन परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ठाण्यातील मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी साचल्याचं पहायला मिळालं. मुंब्रा अमृतनगर परिसरात काही दुकानंही पाण्याखाली गेली. गेल्या सहा तासात मुंब्रात 88.84 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Vasai Palghar Flood Rain : वसईमध्ये पावसाचा जोर वाढला
वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. वसईच्या मिठागर वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर कमरेइतकं पाणी साचलं आहे. या वसाहतीतील सुमारे दीडशे कुटुंब आणि हजाराहून अधिक नागरिकांना कमरेइतक्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसाचा जोर वाढल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे, त्यामुळे महावितरणाने वीजपुरवठा बंद केला आहे.
Palghar rain Red Alert News : पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत
पालघर शहरासह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर-सातपाटी रोडवरील टेंभोडे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता जलमय झाला आहे. रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक वाहनांची गती मंदावली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Amba River Pali Raigad Rain : अंबा नदीने धोका पातली ओलांडली
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पाली, नागोठणे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. अंबा नदीवरील भेरव-खुरावले फाटा येथील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. तर पुलापलीकडील महागाव, वाघोशी, भेरव, ताडगाव या गावांचा पालीशी संपर्क तुटला आहे.
Maharashtra Dam Water Level : राज्यातील धरणांची स्थिती
राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी अद्याप समाधानकारक स्थिती निर्माण झालेली नाही. राज्यातील 3 हजार 28 मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण 10 हजार 443 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तो एकूण क्षमतेच्या 25.56 टक्के आहे.
गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील पाणीसाठा 49.76 टक्के होता. विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 41.04 टक्के, तर नागपूर विभागात 39.07 टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये 32.52 टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात 24.76 टक्के आणि नाशिक विभागात 25.46 टक्के साठा नोंदवला गेला आहे. सर्वात चिंताजनक स्थिती पुणे विभागाची असून तेथील धरणांमध्ये केवळ 16.13 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

