Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानामध्ये (Maharashtra Weather) मोठी तापवत पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेचा कहर बघायला मिळत असून तापमानाच्या पाऱ्याने चक्क 46 ते 47 अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे.
तर कुठे मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rain) एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांना होतांना दिसतोय. दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha Heat) काही जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असून तिथे उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) तीव्र इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने एकाच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे. तर हवामान विभागाने विदर्भासाठी उष्णतेचा अलर्ट जरी केला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, गरज नसेल तर दुपारच्या सत्रात घराबाहेर पडू नये, अशा सूचनाही दिल्या आहे. (Maharashtra Weather Update)
Vidarbha Heat : विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी देशात सर्वाधिक उष्ण शहर
विदर्भातील आज उष्णतेची लाट कायम असणार आहे. यात अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला. तर नागपूर आणि अकोला जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काल (25 मे) विदर्भातील ब्रह्मपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान देशातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. त्यामुळे गरज नसतांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे. त्या खालोखाल नागपूर 46.5, गडचिरोली 46.4, गोंदिया 46.1, चंद्रपूर 46, वर्धा 46, अकोला 45.4, अमरावती 45 अंश सेल्सिअस नोंदविले गेलेय. आज देखील तापमान कायम राहणार असल्याची शक्यता आहे.
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे 500 वटवाघळांचा अचानक मृत्यू
दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे 500 वटवाघळांचा अचानक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, हे मृत्यू उष्माघाताने झाले असावे, असा वनविभागाला प्राथमिक अंदाज आहे. यापैकी काही वटवाघळाचे मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.
Pre-monsoon Rain: मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाची दाणादाण, विज पडून जनावर दगावली, घरासह शेतींचेही नुकसान
दरम्यान, मराठवाड्याच्या लातूर शहर आणि निलंगा तालुक्यातील परिसरात वादळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला आहे. यात विज पडून म्हैस आणि बैल ठार झाले आहे. तर घरांसह शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील जेवरी आणि परिसरात काल आलेल्या भीषण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. जेवरी येथील शेतकरी बजरंग नारायण तारे यांच्या म्हशीवर झाड आणि विज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. तसेच मोतीराम हनुमंत तारे यांच्या नवीन घराच्या भिंती कोसळल्या असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
वादळामुळे अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली तर शेतातील शेड तसेच जनावरांचा चारा नष्ट झाला. आंबा पिकालाही मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडले आहेत. तर नेलवाड येथील दोन शेतकऱ्यांची बैल आणि म्हैस विज पडून दगावली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामा करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
लातूर शहरात रात्री पावसाच्या जोरदार सरीने हजेरी लावली होती. लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि परिसर तसेच निलंगा तालुक्यातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापासून उन्हाच्या काहिलीने सर्वसामान्य नागरिकांना हैरान झाले होते. या पावसामुळे वातावरण सुखद झाले आहे.
पावसामुळे सुमारे 700 हेक्टर पेक्षा अधिक केळीचे बागा जमीनदोस्त
जळगाव जिल्ह्यात चोपडा आणि यावल तालुक्यात मान्सून पूर्व वादळी पावसाने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे सुमारे 700 हेक्टर पेक्षा अधिक केळीचे बागा जमीन दोस्त झाल्याचा अंदाज आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती व देशांतर्गत असलेल्या डिझेल टंचाईमुळे आधीच केळीची निर्यात रखडल्याने, केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच मान्सूनपूर्व वादळी पावसाने आता पुन्हा नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : एबीपी माझा वेब टीम

