Sanjay Raut on Bacchu Kadu: 'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? आता कोण मूर्ख आहे ते पाहावे लागेल, अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा निर्णय आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बच्चू कडू शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
सुषमा अंधारे नाराज नाहीत
बच्चू कडू यांच्या या निर्णयावर टीका करताना राऊत म्हणाले, "एका आमदारकीसाठी तुम्ही असा निर्णय घेत आहात, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता आता संपली आहे." भूतकाळातील आठवण करून देताना राऊत म्हणाले, "हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे." अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील. एकच जागा द्यायची होती, उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. सुषमा अंधारे नाराज नाहीत, त्या कडवट शिवसैनिक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आमचे खासदार खांद्याला खांदा लावून होते
दरम्यान, काँग्रेसच्या निर्णयावर ते म्हणाले की, "वारंवार आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. डीलिमिटेशनच्या बिलाला जो काँग्रेसचा विजय झाला आणि मोदींचा पराभव झाला, त्यामध्ये आमचे नऊ खासदार तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते. 2029 साली जर संधी प्राप्त झाली, तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर. त्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्या-राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य आहे असं मी मानतो." महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं व्हिजन ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला. "या देशात नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे, अशा वेळी विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षाशी संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

