West Bengal Election Result : एकीकडे भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारत तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त केला. त्याचवेळी दुसरीकडे ममता बॅनर्जींनाही मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांची सत्तेसोबत आमदारकीही गेली आहे.
भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला आहे. भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,111 मतांनी पराभव केला.
ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. ममता बॅनर्जींचा पराभव होणं गरजेचं होतं. हा विजय बंगालच्या एकजुटीचा असल्याची प्रतिक्रिया शुभेंदु अधिकारी यांनी दिली.
भाजपचे नेते आणि पश्चिम बंगालच्या विजयाचे शिल्पकार शुभेंदु अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन ठिकाणी विजय प्राप्त केला आहे. भवानीपूरमधून त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. सुरुवातीपासून अटीतटीची लढाई सुरू असलेल्या भवानीपूरमध्ये अखेर ममता बॅनर्जींचा 15,111 मतांनी पराभव झाला.
भाजपवर आरोप
दरम्यान, भवानीपूरमध्ये मतमोजणीवेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. मतमोजणी सुरू असताना ममता बॅनर्जींना केंदावर सोडण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला. आपल्याला सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली, लाथ मारली असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच आपल्या पोलिंग एजंटलाही आत सोडण्यात आलं नाही असाही आरोप त्यांनी केला.
भाजपने 100 हून अधिक जागा लुटल्या. निवडणूक आयोग निष्पक्ष नाही, हा नैतिक विजय नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. त्यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला.
भाजपच्या मुख्यालयात जल्लोष
पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी.नड्डा यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त झालं आणि विकासयुक्त सरकार सत्तेत आलं असं मोदी यावेळी म्हणाले. सोबतच केरळ, तामिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याची भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.
Author : एबीपी माझा ब्युरो

