Marathi Actress Manasi Salvi: असंभव मालिकेतील 'शुभ्रा' पात्र साकारणारी अभिनेत्री मानसी साळवी (Manasi Salvi) आपल्या दर्जेदार अभिनयाने घराघरात लोकप्रिय झाली. नंतर मराठी चित्रपट किंवा मालिकांमध्ये फारशी दिसली नसली तरी ती सध्या हिंदी मालिका विश्वात सक्रिय आहे.
' महादेव अँड सन्स' या मालिकेतून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. पण, ही मालिका तिने अचानक सोडल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. या मालिकेत ती भानू वाजपेयी हे खलनायकी पात्र साकारत होती. पण तिने अचानक निर्मात्यांना नोटीस देत मालिका सोडली. आता या प्रकरणी निर्मात्यांनी मौन सोडले असून अभिनेत्री मानसी साळवी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी त्यांनी दिलीय. (Mansai Salvi quits Hindi Serial)
नेमकं झालं काय ?
'महादेव अँड सन्स' या मालिकेत धडाकेबाज 'भानू वाजपेयी'ची भूमिका साकारणाऱ्या मानसी साळवीने मालिका अर्धवट सोडून दिली. मालिका नेमकी कशामुळे सोडली यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया तिने दिलेली नाही. मात्र, या मालिकेचे निर्माते सौरभ तिवारी यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं ' कामाचे दिवस कमी झाल्यामुळे अभिनेत्री मानसी साळवीला चिंता वाटत होती. पण कामाचे तास वाढणे किंवा कमी होणे हे डेली सोप साठी नवी गोष्ट नाही. आम्ही तिला सांगितले यावर काम करू,पण तिलाच पुढे काम करायचे नव्हते.तिने 20 एप्रिल रोजी ईमेलद्वारे आम्हाला शो सोडण्याचा निर्णय कळवला आणि सांगितले 15 मे हा तिच्या शूटिंगचा शेवटचा दिवस असेल. ' असं निर्मात्यांनी सांगितलं.
निर्मात्यांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
ते पुढे म्हणाले ' तिने आमच्या सोबत केलेला करार मोडून अशाप्रकारे सोडून जाऊ शकत नाही. तिला किमान सहा महिन्यांची नोटीस देणे बंधनकारक आहे. बाहेर पडण्याची कोणतीही तारीख ही परस्पर संमतीने ठरवलेली असते ती कोणत्याही एका व्यक्तीने ठरवायची नसते. कायदेशीर आणि व्यावसायिकदृष्ट्या इतक्या कमी वेळात शो सोडणे योग्य नाही.प्रोडक्शन हाऊसनेही काही सूचना तपासल्या आहेत. मात्र त्या क्रिएटिव्हिटीच्या गरजा लक्षात घेता त्याची अंमलबजावणी करणे आत्ता योग्य नाही. तिचं बाहेर पडणे हे केवळ परस्पर संमतीनेच शक्य आहे.कराराच्या विरोधात गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते ' असं निर्मात्यांनी म्हटलं.
Author : abp majha web team

