आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर ते ठाम आहेत.
सरकारकडून 10 महिने झाले तरीही सातारा गॅझेट लागू करण्यात आले नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
उपोषणाच्या आदल्या दिवशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी दीड तास मनधरणी करूनही तोडगा न निघाल्याने जरांगे उपोषणावर ठाम राहिले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करताच सरकारची मोठी धावपळ उडाली असून, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासनाने एक विशेष अधिकृत मसुदा म्हणजेच ड्राफ्ट (Draft) तयार केला आहे.
सरकारचे शिष्टमंडळ हा मसुदा घेऊन अंतरवाली सराटीत दाखल झाले असून त्यांच्यासोबत चर्चाही सुरू आहे. मात्र, जरांगे पाटील मागण्यांवर ठाम आहे.
सोशल मीडियासह प्रत्यक्ष अंतरवाली सराटीत जाऊन मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे, उपोषणस्थळी मोठी गर्दी दिसून येते.
उपोषणस्थळी गाड्यांची पार्कींग व्यवस्था केली असून चारचाकी वाहनांची ते पार्कींग स्थळ भरु गेले होते, तसेच ग्रामस्थांसह राज्यभरातून मराठा बांधव तेथे दाखल होत आहेत.
दरम्यान, अंतरवाली सराटी जवळ धुळे-सोलापूर महामार्गावर मनोज जरांगे समर्थकांनी रस्ता रोकोही केला होता, आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या केला, तेव्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांकडून महामार्ग खुला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत होत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.

