राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून विविध जिल्ह्यात कुठे वादळवारा तर कुठे गारांचाही पाऊस झाला आहे. दिवसभराच्या कडक उन्हानंतर संध्याकाळी अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी बसरल्या आहेत.
गेले अडीच महिने अतिशय तीव्र उन्हामुळे चंद्रपूर जिल्हा अक्षरशः होरपळून निघालाय. त्यातच आज संध्याकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
सुमारे अर्धा तास हा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलाय. त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना हा पाऊस दिलासादायक ठरला. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हा पाऊस बरसत असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी काळातही अशाच पद्धतीने पाऊस बरसत रहावा अशीच चंद्रपूरकरांची अपेक्षा आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा आणि वाढलेल्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला आहे.
नांदगाव, मनमाड शहरासह ग्रामीण भागात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही काहीसा सुटकेचा श्वास घेतला.
या अवकाळी स्वरूपाच्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीच्या कामांना सुरुवात होण्यास मदत मिळणार आहे..अनेक भागात शेतजमिनी ओलावल्याने मशागतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव व भडगाव तालुक्यात आज सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरातही सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळालाय.
दुसरीकडे मसेवाडी येथील शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची घटना समोर आलीय. जोरदार वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्याने शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहे. बीडमध्ये दुपारपासूनच गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास परिसरात दमदार पाऊस झाला. तर तर अजूनही काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.

