Mirzapur The Movie Advance Booking: मिर्झापूर ही उलट्या काळजांचे पात्र असणाऱ्या माणसांची सिरीज. 'मिर्झापूर'... नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो हिंसाचार, बंदुका, रक्तपात, सत्ता आणि एकमेकांच्या जीवावर उठलेली पात्रं!
ओटीटीवर दोन सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या 'मिर्झापूर'चा (Mirzapur) धुमाकूळ आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ओटीटीवर दोन्ही सिझनमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातल्यानंतर या पात्रांसह 4 सप्टेबर रोजी 'मिर्जापूर : द मुवी ' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिलीजआधीच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल 3 तास 17 मिनिटे 19 सेकंदांचा हा चित्रपट असणार आहे. मिर्झापूरमधील पात्रांची हिंसा, हत्यार वापरणारी पात्रे, त्यांचे एकमेकांमधील संबंध यामुळे या चित्रपटाच्या तिकिटांची हातोहात विक्री झाली आहे. (Mirzapur The Movie Advance Booking)
रिलीजआधीच 23 हजारांहून अधिक तिकिटांची विक्री
'मिर्झापूर : द मूवी'ला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतोय, याची झलक अॅडव्हान्स बुकिंगमधूनच पाहायला मिळते. आतापर्यंत चित्रपटाची 23 हजार 216 तिकिटं बुक झाली आहेत. यातून 77 लाख रुपयांहून अधिक कमाई झाली आहे. बुकिंगचा वेग कायम राहिला, तर हा आकडा जवळपास 1 कोटी 85 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
ओटीटीवरील 'मिर्झापूर'चा धुमाकूळ थिएटरमध्येही चालणार?
ओटीटीवर 'मिर्झापूर'च्या दोन सीझननी प्रेक्षकांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि इतर पात्रांभोवती फिरणारी सत्ता, हिंसा आणि संघर्षाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. आता याच जगातील पात्रं मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. चित्रपटाच्या प्रोमोमध्ये दुसऱ्या सीझनमधील काही दुय्यम पात्रांना महत्त्वाची भूमिका मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. भयमुक्त उत्तरप्रदेश ही संकल्पना पुढे विकसित करताना पुन्हा एकदा गुड्डू पंडित आणि कालीन भैय्या यांच्यातील संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चित्रपटात नेमकी किती हिंसा पाहायला मिळणार? पात्रांच्या नात्यांमध्ये कोणते नवे ट्विस्ट येणार? आणि 'मिर्झापूर'च्या या दुनियेत आता कोणाचं वर्चस्व पाहायला मिळणार? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट रिलीज झाल्यानंतरच मिळणार आहेत.
पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदूसह तगडी स्टारकास्ट
'मिर्झापूर : द मूवी'मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू हे कलाकार पुन्हा एकदा आपल्या गाजलेल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत श्वेता त्रिपाठी, अभिषेक बनर्जी, शाजी चौधरी, कुलभूषण खरबंदा आणि श्रेया पिळगावकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. 'पंचायत'मधील सचिवजी म्हणून घराघरात पोहोचलेला जितेंद्र कुमारही या चित्रपटात दिसणार आहे. तो बबलू पंडितची भूमिका साकारणार आहे. याशिवाय रवि किशन, सोनल चौहान आणि सुशांत सिंह हे कलाकारही चित्रपटाचा भाग आहेत.
3 तास 17 मिनिटांचा थरार
4 सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली आहे. मात्र 'मिर्झापूर'ची हिंसक आणि प्रौढ आशयाची कथा पाहता चित्रपटाला A Certificate देण्यात आलं आहे.विशेष म्हणजे चित्रपटाची लांबीही मोठी आहे. 'मिर्झापूर : द मूवी' तब्बल 3 तास 17 मिनिटे 19 सेकंदांचा आहे. म्हणजेच जवळपास साडेतीन तास प्रेक्षकांना 'मिर्झापूर'च्या दुनियेत घालवावे लागणार आहेत.
पंकज त्रिपाठींच्या चाहत्यांचीही उत्सुकता शिगेला
पंकज त्रिपाठींचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही प्रेक्षकांचं विशेष लक्ष आहे. ओटीटीवरील 'मिर्झापूर' आणि मोठ्या पडद्यावरचा 'मिर्झापूर : द मूवी' यांची तुलना होणं साहजिक आहे.ओटीटीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या कथेला थिएटरमध्ये प्रेक्षक किती प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगचा वेग पाहता सुरुवात तर दमदार झाली आहे. आता 4 सप्टेंबरला 'मिर्झापूर'चा हा धुमाकूळ बॉक्स ऑफिसवर किती चालतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Author : abp majha web team

