Monsoon Rain: गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या सात दिवसांत देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन होणार असून, रविवारपासूनच मुंबई आणि परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
मात्र, एकीकडे हा तात्कालिक दिलासा मिळत असतानाच, हवामान विभागाच्या दुसऱ्या दीर्घकालीन अंदाजाने (Long Range Forecast) महाराष्ट्राची चिंता कमालीची वाढवली आहे. यंदा संपूर्ण मान्सून हंगामात राज्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची आणि जून महिन्यात उष्णतेच्या लाटा (Heatwaves) तीव्र राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Monsoon Rain: मुंबईमध्ये रविवारपासून तीन दिवस हलक्या सरींची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये रविवारपासून सलग तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बरसतील. याशिवाय, पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी रविवारी हलक्या सरी तर सोमवारी मेघगर्जनेसह (Thunderstorm) पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही सोमवार आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याने तेथेही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Monsoon Rain: यंदा मान्सून हंगामात केवळ 90 टक्के पाऊस
आयएमडीने (IMD) नैऋत्य मान्सून 2026 साठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. यानुसार, जून ते सप्टेंबर 2026 या चार महिन्यांच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, जी सामान्य प्रमाणापेक्षा कमी मानली जाते. यंदा मध्य भारतात 43 टक्के, तर दक्षिण द्वीपकल्पात 45 टक्के संभाव्यतेसह सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे चालू वर्षी राज्याला पावसाच्या मोठ्या तुटीचा सामना करावा लागू शकतो.
Monsoon Rain: कोअर झोनमधील कोरडवाहू शेती धोक्यात?
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग हे 'मान्सून कोअर झोन'मध्ये येतात. हा झोन देशातील आणि राज्यातील कोरडवाहू शेतीचा मुख्य कणा मानला जातो. मात्र, या कोअर झोनमध्येच सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची 43 टक्के शक्यता आहे. मान्सूनच्या पहिल्याच म्हणजेच जून महिन्यात देशभरात सरासरीच्या 92 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. परिणामी, जून उजाडला तरी महाराष्ट्रात पावसाची ओढ कायम राहू शकते, ज्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर विपरित परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
Monsoon Rain: जून महिन्यात रात्रीही उकाडा
पावसाची तूट वर्तवली असतानाच, हवामान विभागाने जून महिन्यात विदर्भ, मराठवाडा आणि अंतर्गत महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहून उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, किमान तापमानही चढे राहणार असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळीही तीव्र उकाड्याचा सामना करावा लागेल. सध्या प्रशांत महासागरात न्यूट्रल परिस्थिती असली, तरी मान्सूनच्या उत्तरार्धात 'एल निनो' परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार, ज्या ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्या वर्षी भारतात, विशेषतः मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट जाणवते.
राज्य आणि देश-विदेशातील बातम्या; पाहा व्हिडीओ

