Mumbai Accident Malad: मुंबईतील मालाड परिसरात रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. कृष्णा चमणकर या 70 वर्षांच्या व्यक्तीचे कारवरील नियंत्रण सुटून त्याने अनेक वाहनांना धडक दिली होती.
यामध्ये वकील असणाऱ्या ॲडव्होकेट प्रियांका सत्रा (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला होता. प्रियांका सत्रा आणि त्यांचे पती मयांक सत्रा हे दोघे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी चमणकर यांच्या भरधाव वेगातील कारने त्यांच्या बाईकला धडक (Accident news) दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की, प्रियांका आणि मयांक हे दोघेही उडून लांब पडले. यामध्ये प्रियांका यांनी जागेवरच प्राण सोडला तर मयांक हे गंभीर जखमी झाले. (Mumbai Road Accident news)
प्रियांका सत्रा यांच्यावर अपघाताच्याच रात्री अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे. तेव्हा प्रियांका आणि मयांक यांचे नातेवाईक शोकाकूल होते. प्रियांका यांना आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. हे दोघेही आईच्या अचानक जाण्याने धाय मोकलून रडत होते. या अपघातात मयांक सत्रा हेदेखील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, प्रियांका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिला शेवटचं पाहता यावं, यासाठी मयांक सत्रा हे गंभीर जखमी असूनही व्हिलचेअरवरुन स्मशानभूमीत आले होते. त्यांनी पाणावल्या डोळ्यांनी आपल्या पत्नीचे दर्शन घेतले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
Mumbai Accident news: मालाडमध्ये नेमकं काय घडलं?
मालाड पोलीस ठाणे हद्दीत एस व्ही रोड, मामलेदार वाडी रोड जंक्शन येथे रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री आठ वाजताच्या सुमारास कृष्णा चमणकर हे एमजी विन्सर ही कार घेऊन जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. ही कार इतकी वेगात होती की, या कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा आणि बाईकवरील दोघे असे मिळून सहा जण जखमी झाले. या घटनेनंतर पोलिासंनी कृष्णा चमणकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी त्यांना बोरीवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आले.

